महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच नवीन बिटको रुग्णालयात गेल्या वर्षीच कोविड रुग्णांची ऑक्सिजनसाठी होणारी धावपळ बघून ऑक्सिजनच्या टाक्या बसवून तेथे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एकच निविदा काढवण्याचे ठरवले होते. तईओ निप्पॉन या कंपनीला हे काम देण्यात आले. गेल्या वर्षी या टाक्या बसवण्याचे काम सुरू केले असले तरी ते प्रचंड लांबले. झाकीर हुसेन रुग्णालयात तर ३१ मार्च रोजी ही १३ केएल क्षमतेची टाकी बसवण्यात आली. अवघ्या एकविसाव्या दिवशीच टाकीच्या पाइपला गळती लागली आणि दुर्घटना घडली. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर कंपनीचे अधिकारी तब्बल ४८ तासांनी दाखल झाले. त्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणावर कोरडे ओढले जात होते.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी तातडीची बाब म्हणून कंपनीला तंत्रज्ञ नियुक्त करण्याची सूचना करताना दुर्घटना कशी काय घडली, याबाबत विचारणा केली हेाती. त्यावर कंपनीने ऑडिट करून एक अहवाल महापालिकेला सुपूर्द केला. त्यात टाकीसह सर्व उपकरणे निरंतर सुरू असल्याने ओव्हरलोड झाले आणि उपकरणांवरील ताण वाढला. त्यातून पाइपला गळती झाल्याचा दावा केला आहे. मात्र २२ जणांचे प्राण गेलेल्या या दुर्घटनेत इतका प्राथमिक अहवाल न देता उचस्तरीय अधिकारी नियुक्त करून अहवाल सादर करावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, कंपनीने चोवीस तास तंत्रज्ञ नियुक्त करण्यास नकार दिला आहे.
इन्फो....
तंत्रज्ञांना वेतन देऊन नियुक्त करा
महापालिकेच्या करारात चोवीस तास तंत्रज्ञ नियुक्त करण्याचा उल्लेख नसल्याने या विषयावर बरीच चर्चा झाली होती. मात्र कंपनीने अशा प्रकारे चेावीस तास तंत्रज्ञ नियुक्त करण्याची तरतूद नसल्याने आता चोवीस तास तंत्रज्ञ नेमायचे असतील तर महिन्याला दहा ते बारा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च वेतनावर खर्च करावा लागेल, असे नमूद केले आहे. त्यामुळे हा विषय मागे पडला आहे.