सुधीर कुलकर्णी,नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तडाखा दिला आणि भानावर आलेल्या प्रशासनाने जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेची सज्जता वाढविण्यास सुरुवात केली. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर भासलेला तुटवडा लक्षात घेता, जिल्ह्यात शासकीय व महापालिकांच्या रुग्णालयात ४० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्याचा निर्णय झाला. पण येवला आणि मालेगाव या दोन्ही मंत्रिमहोदयांच्या हद्दीतील प्रकल्प वगळता, अन्य ठिकाणी प्रकल्पांचे काम कासवगतीने सुरू आहे. जून महिना उलटला तरी, या प्रकल्पांचे घोडे विविध तांत्रिक कारणांमुळे अडले आहे.जिल्ह्यात ४० ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २४, केंद्र सरकारच्यावतीने ४, एचएएल व इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या सीएसआर फंडातून ४, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ६, तर मालेगाव महानगरपालिकेत एसडीआरएफ निधीतून २ यानुसार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. त्यानंतर काही सेवाभावी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केल्याने प्रकल्पांच्या संख्येत भर पडत गेली. प्रस्तावित सर्व प्रकल्प हे जूनअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ठेकेदार नेमून प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवातही केली आहे. परंतु, केवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण होऊ शकले आहे. अन्यत्र अद्यापही ऑक्सिजन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.या ठिकाणी होणार प्रकल्प...जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड, ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हर्सुल, निफाड, नगरसूल, लासलगाव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगाव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या २४ ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या ४ ठिकाणी, तर प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, डांगसौंदाणे येथे प्रकल्प होणार आहेत.स्थानिक स्तरावर अनभिज्ञताजूनअखेर हे प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात जून महिना उलटला तरी, केवळ येवला व मालेगाव वगळता अन्यत्र कासवगतीने काम सुरू आहे. शासन पातळीवर प्रत्येक तालुका पातळीवर निविदा काढून त्याद्वारे काम केले जाणार होते. मात्र प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींना हे प्लॅन्ट उभारणीसंदर्भात पुसटशीही कल्पना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच सारी सूत्रे हलवली जाणार असल्याचे स्पष्ट करत अनभिज्ञता दर्शविण्यात आली. हे ऑक्सिजन प्रकल्प एकाच कंत्राटदारामार्फत उभारण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते.काय आहे सद्यस्थिती ?त्र्यंबकेश्वर तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्पासंदर्भात जागेची पाहणी झाली, जागा निश्चित झाली. मात्र त्याचा खर्च कोणी करायचा, या मुद्द्यावर निर्णय होत नसल्याने प्रकल्प लांबणीवर पडत आहे. हर्सुलमध्ये प्रकल्पाची तयारी सुरू असली तरी, तो अद्याप पूर्ण झालेला नाही. जुलैअखेर तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.सुरगाणा येथे जागेची पाहणी झाली, पण त्यावर ठोेस काहीच निर्णय झालेला नाही. येवला येथे लोकार्पण झाले, परंतु रुग्णसंख्या घटल्याने तूर्त त्याची आवश्यकता नाही. मालेगावच्याही प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. कळवण, सिन्नर, नगरसूल येथे काम सुरू आहे. देवळा तालुक्यात आजपर्यंत कोणतीही यंत्रसामग्री आलेली नसल्याने कामाला सुरुवातच झालेली नाही. दिंडोरीत हीच अवस्था आहे. वणीमध्ये ऑक्सिजन टाक्यांकरिता फाऊंडेशनची उभारणी केली जात आहे, तर भारम येथे काही काम झालेले असून जम्बो सेट येणे बाकी आहे. पेठ, नांदगाव, देवळा येथे फारशा हालचाली नाहीत. निफाड तालुक्यात सरकारी व सामाजिक संस्थांच्या मदतीने ६ प्लॅन्ट उभारण्यात येत आहेत. त्यापैकी निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंतमध्ये काही यंत्रसामग्री आली असून जुलैअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. इगतपुरी तालुक्यात फाऊंडेशनचे काम सुरू आहे.
जुलैअखेरपर्यंत प्रकल्प पूर्णत्वासजिल्ह्यातील ३० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प केंद्र शासनाकडून मिळणार असून, ते जुलैअखेरपर्यंत मिळणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) माध्यमातून होणाऱ्या ४ प्रकल्पांपैकी गिरणारे आणि सिन्नर असे दोन प्रकल्प सुरू झाले असून, उर्वरित दोनचे काम सुरू आहे, तर जिल्हा स्तरावरील निधीतून उभारण्यात येणाऱ्या २४ प्रकल्पांपैकी सिव्हील आणि येवल्याचे काम पूर्ण झाले आहे. पिंपळगाव आणि कळवणचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच पूर्ण होईल, तर अन्य वीस प्रकल्पांमध्येदेखील सिव्हील आणि इलेक्ट्रिक वर्क सुरू असून, त्या प्रकल्पांचे कामदेखील जुलैअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.-डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.