ओझर टाऊनशिप : येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर कॅनाल चौफुलीवर इर्टीगा कारने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.बुधवारी (दि.३) दीड वाजेच्या सुमारास दिलीप मुरलीधर गायकवाड (६५) व पत्नी लताबाई (५८) रा. कोकणगांव हे त्यांच्या प्लॅटिना मोटरसायकलने (एम एच १५ जी ज्यू ६३०२) ओझर येथे कोथिंबिरीची विक्री करून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टीगा कारने (एम एच ०४ एच एक्स ६५१७) निपाणी मळ्याजवळील गंगापूर कॅनाल चौफुलीवर त्यांच्या मोारसायकलला धडक दिली.
या अपघातात गायकवाड जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी लताबाई यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात लताबाई गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.५) तक्रार दाखल केली. या प्रकरणी ओझर पोलिसांनी कारचा चालक विपीन पाटील (रा. ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार अंबादास गायकवाड हे करीत आहेत.