ओझरखेड कालव्याला सोडले रबीचे आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 06:19 PM2021-01-25T18:19:25+5:302021-01-25T18:20:27+5:30
शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.
शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.
येथील परिसराला लागून असलेल्या रबी हंगामातील पिके घेण्यासाठी या वर्षातील नुकतेच पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात बहुतांशी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून रबी हंगामातील गहू, हरभरा, मका, उन्हाळी कांदे, जनावरांसाठी चारा व इतर भाजीपाला वर्गीय पिके घेण्यासाठी पाणी देणे गरजेचे असते.
ओझरखेड कालव्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जमिनीपैकी बहुतांशी जमीन डोंगर भागातील ओबड-धोबड व वरकस स्वरूपाचे आहे. त्यामुळे या भागात पडणारा पाऊस भौगोलिक रचनेमुळे लगेच वाहून जातो. तसेच अनियमित पाऊस झाला तर दुबार, तिबार पेरणीच्या संकटांना सामोरे जावे लागते. तेथील जमीन बहुतांशी भागात मुरमाड व हलक्या-मध्यम स्वरूपाची असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होण्यास वेळ लागत नाही.
काही ठराविक भागात पाणीटंचाईसुद्धा तितकीच भासली होती व उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. परिसरातील रानवड, सावरगाव, नांदू शिरवाडे, मुखेड, वावी, नांदूर, गोरठाण गावातील परिसर व परिसरातील पाणीपुरवठा योजना या ओझरखेड कालव्याला येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असतात या गावातील पाणी वापर संस्थांचा व मागणीनुसार विभागाने बैठकीअंतर्गत पाण्याचे नियोजन केले जाते त्यामुळे या वर्षाच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.
वर्षातील पहिले आवर्तन
या वर्षातील पहिले आवर्तन सोडण्यात आले असून पाण्याचा योग्य वापर शेतकरीवर्गाने करावा. पाणी घेण्यासाठी कोणीही शेतकरीवर्गाने वंचित राहू नये. तसेच गाव तळे नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात यावे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे या गावांतील परिसराला पाणीटंचाई तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.