त्र्यंबकेश्वर : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सामुंडी व खंबाळे येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी केंद्राचा शुभारंभ तहसीलदार दीपक गिरासे, आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष दौलतराव आहेर यांच्या हस्ते व सापगावचे रावजी दिवे, नवनाथ कोठुळे, रामदास वारुंणसे, दामोदर कडलग, सचिन कडलग, शिवाजी पा.गुंड, बच्चू मेंगाळ, आदिवासी सोसायटीचे सचिव एकनाथ पा.गुंड आदींच्या उपस्थितीत पार पडला.
राज्यातील आदिवासी व बिगरआदिवासी विभागातील शेतकऱ्यांच्या धान्याला आधारभूत किंमत, हमीभाव मिळण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आधारभूत केंद्र सुरू केले आहे. ही खरेदी योजना ऑनलाइन असून, अगोदर आपल्याजवळील किती भात विकावयाचा आहे, याबाबत ऑनलाइन मागणी करावी लागेल. भात देताना सातबारा उतारा त्यावर भात उत्पादक असा शेरा हवा. बँकेचे पासबुक आधारकार्ड नोंदवून मग जेवढा भात असतील तेवढी खरेदी करून पावती मिळेल आणि सात दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. बँकेतूनच शेतकऱ्यांना पेमेंट मिळेल. तसेच पाच महिन्यांनी जेवढा क्विंटल भात विकला जाईल त्या प्रत्येक क्विंटलमागे ७०० रुपये बोनस मिळेल. म्हणजेच प्रतिक्विंटलला २५६८ रुपये दर मिळू शकेल.
-----------------------
आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र सरकारची योजना असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बिगरआदिवासी भागात महाराष्ट्र स्टेट को- ऑप. मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या मार्फत खरेदी करण्यात येणार आहे, तर आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या मार्फत खरेदी करण्यात येणार आहे.
--------------
दर (क्विंटलमध्ये)
भात/धान = रु.१८६८/-
भात/धान (ए ग्रेड) = रु. १८८८/-
ज्वारी = रु. २६२०/-
ज्वारी मालदांडी = रु. २६४०/-
बाजरी = रु. ६६९५/-
कपाशी मध्यम धागा = रु. ५५१५/-
कपाशी लांब धागा = रु.५८२५/-
ऊस = रु.२८५०/- प्रतिटन
वरील पिकापैकी त्र्यंबकेश्वर परिसरात फक्त भात, वरई व नागली (नाचणी) ही पिके घेतली जातात. नागली या भागातील लोकांचे मुख्य अन्न नागलीची भाकरी असल्याने नागली सहसा कोणी विकत नाही.