पद्मजांच्या सुरावटींनी ‘मंगलदीप पाडवा पहाट’ची मैफल रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:37 AM2019-10-27T00:37:19+5:302019-10-27T00:37:59+5:30
दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे.
नाशिक : दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे. लोकमत सखी मंच आणि सुयोजित व्हिरीडीयन व्हॅलीजच्या वतीने सोमवारी (दि. २८) पहाटे ५.३० वा. या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपोत्सवाच्या या पावन पर्वातील पद्मजाजींच्या या सुरेल मैफलीचे रंग लोकमत वाचक परिवाराचा आनंद द्विगुणित करणार आहेत. गोदापार्कलगतच्या अप्पर सावरकरनगरला ही मैफल रंगणार असून, या कार्यक्रमासाठी हॉटेल एक्स्प्रेस इनचे विशेष सहकार्य लाभले आहे. पद्मजा या प्रख्यात गायिका आणि संगीतकार आहेत. त्यांचा जन्म हा मुळात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा लाभलेल्या घराण्यात झाला. काही काळातच एक अष्टपैलू गायिका म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
त्या भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच गझल्स, भक्तिसंगीत हे प्रकारही तितक्याच मधुरतेने गातात. पद्मविभूषित पंडित जसराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांनी पंडित राम नारायण आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. अत्यंत सुरेल असा हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असल्याने रसिकांनी आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गाजलेले अल्बम्स आणि गझल्स
पद्मजा यांचे ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’, ‘घर नाचले नाचले’ या नावाचे संग्रह गाजले आहेत. त्यातील कवितांचे लेखन कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशा नामवंत कवींनी केलेले होते. त्याशिवाय मराठी गझल्सचा संग्रह असलेले ‘हे गगन’, ‘हे स्पर्श चांदण्याचे’ हे दोन अल्बम व ‘मेघा रे’ची निर्मिती त्यांनी केली होती. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या ‘गीत नया गाता हूँ’ या काव्यरचनांवर आधारित अल्बमबद्दल तर खुद्द अटलजींनी त्यांची स्तुती केली होती.