नाशिक : वेधशाळेने यंदा पर्जन्यमान सरासरी गाठणार असल्याचा अंदाज वर्तवित दिलासा देण्याचा प्रयत्न केला; परंतु दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात जुलैपर्यंत जलसंकट गहिरे होत जाणार असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविले आहे. पंचागकर्त्यांच्या मते पहिल्या चारही नक्षत्रात मध्यम पाऊसमान राहणार असून आश्लेषा, मघा या नक्षत्रांमध्ये दमदार पावसाचा तर पूर्वा आणि हस्त या नक्षत्रांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार नाहीच शिवाय पाऊस कशीबशी सरासरी गाठेल, असे भाकीतही केले आहे. त्यामुळे पंचांगकर्त्यांनीही आता नागरिकांना पाणीबचतीचा मौलिक सल्ला दिला आहे. धरणांमधील घटत चाललेला पाणीसाठा, आटलेले जलस्त्रोत यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ग्रामीण भागाबरोबरच यंदा प्रथमच नागरी भागालाही जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांत दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध धरणांतील पाणीसाठ्याचे जुलैअखेरपर्यंत नियोजन करण्यात आलेले आहे. या जलसंकटाचा सामना केला जात असतानाच भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळांसह काही विदेशी संस्थांनी यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहे. परंतु, पंचांगकर्त्यांनी यंदा पाऊस कशीबशी सरासरी गाठणार असल्याचा आणि पावसाच्या नक्षत्रांपैकी केवळ ३ ते ४ नक्षत्रांतच चांगला पाऊस होण्याचा अंदाज बांधला आहे. दाते पंचांगानुसार यंदा मृग, आर्द्रा, पुनर्वसू आणि पुष्य या पहिल्या चार नक्षत्रांत पाऊसमान मध्यम राहणार आहे. मृग नक्षत्रात पावसाचा अंदाज हुलकावण्या देणारा तर आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात मध्यम पाऊस राहणार आहे. पुष्य नक्षत्रात उष्णतामानातील फेरफारामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी खंडित पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
पंचांगकर्ते म्हणतात, जुलैपर्यंत गहिरे जलसंकट
By admin | Published: March 15, 2016 12:10 AM