पंचवटी परिसरात महिलेची सोनसाखळी ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:25 AM2019-12-23T01:25:11+5:302019-12-23T01:26:56+5:30
वृंदावननगर परिसरात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.२१) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंचवटी : वृंदावननगर परिसरात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.२१) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयंत शंकर महाजन (रा. वृंदावननगर) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. जयंत हे त्यांच्या पत्नीसह परिसरातून पायी जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी जयंत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची १६ हजार रु पये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. यामुळे महाजन यांच्या पत्नी पल्लवी महाजन यांच्या गळ्यालाही इजा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास आडगाव पोलीस तपास करीत आहेत.
आडगाव, पंचवटी व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अद्यापही सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने महिलांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पायी जाणाऱ्या महिलांना चोरटे लक्ष्य करीत आहेत. महिला एकटी असो किंवा तिच्यासोबत कोणी पुरुष असले तरीदेखील चोरटे सोनसाखळी हिसकावून पोबारा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नव्याने विविध कॉलन्या, उपनगरे, गृहप्रकल्प उदयास आले आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक : हिरावाडीतील मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित दिनेश सनान्से (१९, रा. पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पोलिसांनी संशयित दिनेशविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
गुुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार
नाशिक : नांदूर नाका भागातील एका महिलेस धमकी देत संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळू गिरिधर जाधव याच्याविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेसोबत असलेल्या ओळखीमुळे संशयित बाळू याने पीडितेला पाथर्डीफाटा येथील एका कॅफेत पाण्यामध्ये गुंगीचे औषध पाजून येथील एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने तिचे मोबाइलवर चित्रीकरण व छायाचित्रे काढून ते सासरी व माहेरी व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक ए. के. जगताप हे करीत आहेत.