नाशिकरोड : रेल परिषदेकडून पंचवटी एक्स्प्रेस २ आॅक्टोबरपासून आदर्श ट्रेन म्हणून घोषित केली जाणार आहे. ही समाजसेवी संस्था रेल्वेच्या मदतीने पंचवटी एक्स्प्रेस फेरीवाले, भिकारी, पाकिटमार, चेन स्नॅचर्स यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी सांगितले की, यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना १५ आॅगस्टला परिषदेने पत्र लिहिले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना वरील जाचापासून मुक्ती दिली जाणार आहे. एखादी रेल्वे गाडी अशा पद्धतीने आदर्श ट्रेन म्हणून ओळखली जाण्याचा रेल्वेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग आहे. या गाडीतून फुकटे प्रवासी व चोरांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष पथक नेमण्याची विनंती रेल परिषदेने रेल्वेला केली आहे. मनमाड ते नाशिक व इगतपुरी ते कल्याण दरम्यान ही पथके कारवाई करतील. २००९ साली रेल्वे परिषदेने आदर्श कोच ही संकल्पना राबवली. या कोचमध्ये पासधारकच असतात. गाडी सुरू झाल्यावर त्यांना आराम मिळावा म्हणून कोणी कोणाशी संवाद साधत नाही की मोबाइल सुरू करत नाहीत. वीज बचतीसाठी दिवे बंद केले जातात. गाडीत प्रथमोपचार पेटी आहे. प्रवाशांना पुस्तक वाचण्यासाठी वेगळा वेळ दिला जातो. फेरीवाले, भिकाºयांना कोचमध्ये प्रवेश नसतो. २०१३ साली या कोचमध्ये छोटेखानी विवाह समारंभ झाला. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली. कोचच्या स्वच्छतेबाबतही २०१२ साली नोंद झाली होती. २०१५ साली या कोचच्या प्रवाशांनी रेल्वेला १०० पत्रे दिली. प्रत्येक पत्राला पोच मिळाली. त्याबदलही लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. प्रवाशांच्या सहभागाने पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा एकदा नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आली आहे. रेल्वेच्या उत्पन्नासाठी आणि गाडीच्या स्वच्छतेसाठी एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ असून रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्र्यांनीदेखील संघटनेच्या या मोहिमेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे येत्या आॅगस्टपासून पंचवटी एक्सप्रेस विक्रमाच्या मार्गावर धावणार आहे.गांधी जयंतीपासून होणार सुरुवातआदर्श कोच असा किताब मिरविणारी पंचवटी एक्स्प्रेस ही संपूर्ण रेल्वेगाडीच विक्रमाच्या दिशेने धावणार आहे. गांधी जयंती म्हणजेच २ आॅक्टोबरपासून पंचवटी एक्स्प्रेसची काळजी रेल परिषद घेणार आहे. संपूर्ण पंचवटी एक्स्प्रेसचे डबे हे एकाच रंगाचे असणार असून या गाडीमध्ये एकही विना तिकीट प्रवासी प्रवास करणार नाही याची काळजी रेल परिषदेचे स्वयंसेवक घेणार आहेत. रेल्वे प्रशासनाचे तिकीट निरीक्षकांची टीम या स्वयंसेवकांना मदत करणार आहे. एकूण प्रवाशांच्या केवळ ४० टक्के इतकेच उत्पन्न पंचवटी एक्स्प्रेसमधून मिळते. हे उत्पन्न १०० टक्के करण्याचा निर्धार रेल परिषदेने केला आहे. शिवाय या गाडीतून एकही भिकारी प्रवास करू शकणार नाही, अशी काळजी घेतली जाणार असून स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जागृती केली जाणार असल्याचे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी सांगितले.
पंचवटी एक्स्प्रेस होणार ‘आदर्श ट्रेन’; रेल परिषदेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:09 PM