कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ
By धनंजय वाखारे | Published: July 21, 2023 06:09 PM2023-07-21T18:09:25+5:302023-07-21T18:09:32+5:30
इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे.
नाशिक: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या मुघलकालीन कावनई किल्ल्याचा काही भाग शुक्रवारी (दि.२१) ढासळल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. सुदैवाने, या किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती नसल्याने जिवितहानी झालेली नाही.
इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुघल काळातील कावनई किल्ल्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे आसपासच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. सुदैवाने, या किल्ल्याच्या पायथ्याशी कोणतीही वस्ती नसल्याने जिवितहानी टळली. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरातील विटूर्ली शिवारात दोन घर आहेत. त्यातील कुटूंबीयांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
कावनई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक
सप्तशृंगी गडाबाबतही अहवाल मागविला
इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पाश्व'भूमीवर कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील परिस्थितीचाही आढावा प्रशासनाने शुक्रवारी कळवण येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. सप्तशृंग गड येथील आई भगवती मंदीरात जाणे येणे साठी असणाऱ्या पायरीच्या आजूबाजूचा डोंगराळ भाग असल्याने, सदर परिसरात माती साचलेली आहे. सदर परिसरात खालच्या बाजुला नागरी वस्ती आहे. त्यामुळे दगडी बांध किंवा सरंक्षण भिंत हे काम होणे आवश्यक असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबतही पालकमंत्री भुसे यांनी सरकार अतिशय सकारात्मक असून संबंधित यंत्रणेला जागेची पाहणी करून अहवाल मागविण्यात आला असल्याचे सांगितले.