दहशत : दुचाकीस्वारांचा होतो पाठलाग, अनेक मेंढपाळांचे स्थलांतर

By admin | Published: January 10, 2015 11:17 PM2015-01-10T23:17:42+5:302015-01-10T23:17:44+5:30

मांगबारी घाट, बिबट्या अडवितो वाट

Panic: Two Wheelchains Chase, Multiple Sheep Transfers | दहशत : दुचाकीस्वारांचा होतो पाठलाग, अनेक मेंढपाळांचे स्थलांतर

दहशत : दुचाकीस्वारांचा होतो पाठलाग, अनेक मेंढपाळांचे स्थलांतर

Next

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सटाणा मार्गावरील मांगबारी घाटात बिबट्याची दहशत पसरली असून, रात्रीच्या वेळी घाटातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना यामुळे धडकी भरत आहे. घाटात बिबट्या आपली वाट अडवितो की काय, अशी भीती दुचाकीस्वारांमध्ये व्यक्त होऊ लागली असून, अनेकवेळा रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळले
जात असल्याचे दिसून येत
आहे. दरम्यान या भागात पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
खामखेडा गावाच्या उत्तरेस थेट मोकभणगीपर्यंत तब्बल ३०-३५ डोंगर असून, चंदननळी, मेंगदर, फांगदर, वाकड्या, बुटीचे रान, शिंपल्या तसेच लोहरदरे अशी नावे असलेली मोठी डोंगररांग येथे आहे. या डोंगरांवर आजही अनेक जंगली स्वापदांचे वास्तव्य आहे. मागील सहा वर्षांपासून या डोंगररांगेत सुमारे आठ ते दहा बिबट्यांचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मागील दोन महिन्यांपासून डोंगर परिसर, आजूबाजूचा शेतशिवार आणि मांगबारी घाटात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. संध्याकाळच्या वेळेस घाटातून प्रवास करताना अनेक वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन होत असते. ऐन घाटात बिबट्या दिसल्याने वाहनचालकांची त्रेधा उडते. निवाणे येथील बाजीराव तुकाराम अहेर हा तरुण रात्री १० वाजेच्या सुमारास सटाणा येथून घरी पतत असताना मांगबारी घाटाच्या पायथ्याला अचानक बिबट्याच्या डरकाळीने तो घाबरला. परिणामी त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटून मोठा अपघात झाला. या अपघातात सदर तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अवस्थेतही सदर तरुण वाघ वाघ असे शब्द उच्चारत असल्याचे सांगण्यात येत आहे. घाटात सतत बिबट्या आढळत असून, दुचाकीस्वारांसह इतर वाहनांचाही बिबट्या पाठलाग करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी वाहनधारकांनी सांगितले.
घाटात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे वाहधारकांमध्ये भीती पसरली असून, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ व वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संध्याकाळ झाली की बिबट्या घाटात येत असल्यामुळे जिवावर बेतण्यापेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी मांगबारी घाटातून मार्गक्रमण करणे बंद केल्याचे दिसून येत आहे.
बिबट्याच्या संचारामुळे पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. घाटाच्या परिसरात जवळच डोंगररांगा असल्याने बिबट्याला लपण्यासाठी चांगली सोय आहे. दिवसा डोंगरांमध्ये वास्तव्य करून बिबट्या रात्रीच्या वेळी शेतमळ्यांमध्ये आणि घाटात मुक्त फिरत असल्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. मेंढपाळ तसेच पशुपालकांना तर बिबट्याचे सतत दर्शन होत असते. त्यामुळे जनावरे सांभाळण्याची कसतर त्यांना करावी लागत आहे. अनेक मेंढपाळांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. बिबट्या जेरबंद करणे हे देवळा वन विभागासमोर आव्हान ठरले
आहे.
गेल्या दोन तीन दिवसापासून बिबट्याचे दिवसाही दर्शन होत असल्याने या भागात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नानाजी मोरे, संतोष मोरे, शांताराम जाधव, युवराज शिंदे, डॉ. श्यामसुंदर जाधव, डॉ. जितेंद्र अहेर, राहुल सूर्यवंशी, देवीदास गांगुर्डे, श्रीधर वाघ आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Panic: Two Wheelchains Chase, Multiple Sheep Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.