पालकांची फसवणूक : 'स्कॉलरशीप'चे आमीष; पावणे तीन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 PM2021-06-05T16:14:01+5:302021-06-05T16:14:27+5:30
शहरातील काही पालकांशी फोनवरुन संपर्क साधून सर्व शिक्षण सोल्युशन एल. एल. पी. या कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुरीचे आमीष दाखवले.
नाशिक : एका कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुर करुन देण्याचे आमीष दाखवून लबाडांनी शहरातील पालकांना सुमारे पावने तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र श्रीकृष्ण पांडे (३९, रा. उत्तमनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार भामट्यांनी जानेवारी २०२० पासून त्यांच्यासह शहरातील इतर पालकांना गंडा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाबाबत पालक सतर्क झाले आहेत. दरम्यान, भामट्यांनी शहरातील काही पालकांशी फोनवरुन संपर्क साधून सर्व शिक्षण सोल्युशन एल. एल. पी. या कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुरीचे आमीष दाखवले. तसेच याचा लाभ घेण्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पालकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार पालकांनी लिंकवर सांगितल्यानुसार पैसे भरले. मात्र त्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे अनेकांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी दिल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात मोबाइलवरुन संपर्क साधणारे भामटे तसेच ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.