शाळेच्या फी वाढीविरुद्ध पालक संघ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:29 PM2019-07-20T23:29:07+5:302019-07-21T00:18:02+5:30
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
सातपूर : येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांच्या आत समस्या न सुटल्यास शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा पालक संघाने निवेदनाद्वारे दिला आहे.
अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूल आहे. याठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शाळेला विविध समस्यांनी घेरले आहे. शालेय परिसरात पिण्याचे स्वच्छ पाणी नसून, संडास बाथरूमची चांगली सुविधा नाही, बेंचेस, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय, लाइट, फॅन आदी भौतिक सुविधा नाहीत. पावसाळ्यात तर शालेय परिसर अक्षरश: पाण्यात असतो. पाण्याचे डबके साचून विद्यार्थांना त्यातून ये-जा करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत संस्थाचालकांना लेखी निवेदन देऊनही कार्यवाही झालेली नाही. याउलट पालकांना नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्वी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सकाळ सत्रात भरवले जात होते. मात्र सद्यस्थितीत इयत्ता पहिली ते पाचवी सकाळी तर सहावी व सातवीचे वर्ग दुपारी भरवले जातात. शाळेकडे स्वत:ची इमारत असताना दोन टप्प्यात वर्ग भरवून विद्यार्थी व पालकांची गैरसोय केली जात असल्याचा आरोप पालकांंनी केला आहे.
दरम्यान, संस्था अनुदानित असताना संस्थेने फीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. प्राथमिक विभागाची फी ९१० रुपयांवरून १८००, तर माध्यमिक विभागाची फी १२१० रुपयांवरून २००० रुपये एवढी केली आहे. या परिसरातील विद्यार्थी कामगार वर्गातील असून, ही फीमधील भरमसाठ वाढ पालकांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे शाळेतील समस्या व भरमसाठ फी वाढ रद्द न झाल्यास शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रशांत धिवरे, सहसचिव रमाकांत कुलकर्णी, वसंत शिरसाठ, नारायण पवार, विजय दुसाने, पंकज गुजर, विठ्ठल मुळे आदींसह पालकांनी शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.