लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : राज्यव्यापी शेतकरी संप आंदोलनात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुमारे ६१ लाख १२ हजार ३०० रुपयांची उलाढाल बंद झाली होती, तर कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी विविध मागण्यांप्रश्नी संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आंदोलन सुरू असताना नांदगाव येथे आंबे विक्रीसाठी जात असलेल्या व्यापाऱ्यांना तालुक्यातील निमगाव येथे अडवून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे आंबे रस्त्यावर फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. सातबारा उतारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्यावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग रद्द करावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगाव तालुका किसान क्रांती प्रचार समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला आहे.गुरुवारी मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीतील सुमारे ६१ लाख १२ हजार ३०० रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीतील भुसार माल शेंगा, कांदा, भाजीपाला व दूध यातील दररोजची आर्थिक उलाढाल आज ठप्प झाली होती. आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट जाणवत होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरून प्रारंभ झालेला मोर्चा कॉलेजरोडमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनाबाहेर काही काळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी डॉ. एस.के. पाटील, शेखर निकम यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मालेगाव तालुक्यातील शेतकरी संपात सहभागी
By admin | Published: June 02, 2017 12:06 AM