प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, गळक्या बसमुळे छत्रीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:57+5:302021-09-14T04:16:57+5:30
मनोज देवरे लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे ...
मनोज देवरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी आधीच खिळखिळी झाली आहे. त्यात आता महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. नव्या गाड्यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. एसटीचे टायर गुळगुळीत आणि बस गळकी झाल्यामुळे कळवण आगारातील एसटी बसच्या दुर्दशेचा प्रश्न समोर आला असून, तात्पुरती डागडुजी करून बसगाड्या धावत असल्या तरी जास्त पावसात बसमध्ये छत्री किंवा रेनकोट घालून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ या घोषणेसोबत प्रवास करणारी एसटी कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. काही गावांत रस्ता चांगला नसतानाही केवळ प्रवाशांची गैरसोय नको म्हणून तेथे सेवा दिली जात आहे. कळवण आगारात सध्या ६३ बसगाड्या धावत असून, रोज १८४ फेऱ्यांच्या माध्यमातून दररोज ११ हजार प्रवाशांची वाहतूक करून ४ लाख ५० हजार उत्पन्न देणाऱ्या काही बसची कालमर्यादा संपली आहे तरी त्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत कळवण आगारात एकही नवीन बस आली नाही. त्यामुळे आहेत त्या बसगाड्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काही बसच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत, तर काही गाड्यांना इंडिकेटर नाहीत. टायर गुळगुळीत झाल्याने पंक्चरचे प्रमाण वाढले आहे. खराब अवस्थेतील टायरवरच चालकांना गाडी चालवावी लागते. काही बसगाड्यांची बॉडी तर अक्षरशः खिळखिळी झाली असून, पत्रे आवाज करीत असल्यामुळे प्रवाशांना डोकेदुखीचा त्रास होत असून, आर्थिक आवक मोठ्या प्रमाणावर असूनदेखील बसच्या दुरुस्तीसाठी आणि स्पेअरपार्टच्या खरेदीसाठी दुर्लक्ष होत असल्यामुळे मटेरियल मिळत नाही. बसगाड्या दुरुस्तीअभावी पडून राहत असल्यामुळे काही गाड्या मार्गावर पाठविण्याच्याच योग्यतेच्या राहिलेल्या नाहीत. तरीही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि केवळ महसुलाच्या वाढीसाठी बस मार्गावर पाठविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
उपाहारगृह पडले बंद -
कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रवासीच नसल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे थंडावली. पेपर स्टॉल सोडून बसस्थानकांतील परवानाधारकांना दुकाने बंद ठेवणे भाग पडले. या दुकानदारांच्या कुटुंबासह नोकरदार वर्गांवर उपासमारीची वेळ आली आहे. उपाहारगृह व्यवस्थापकाने सुरू करणे परवडणारे नसल्याने राजीनामा दिल्यामुळे सध्या बंद ठेवणे आगाराला भाग पडले. बाळाला पाजण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर असलेल्या हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असते, तर काही ठिकाणी कक्ष खुले ठेवण्यात येत असले तरी त्याठिकाणी प्रवाशांची गर्दी राहत असल्याने महिलांना तेथे जाणे असुरक्षित वाटते. बसस्थानकासमोरील रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. दुसऱ्या बाजूला काम सुरू असल्यामुळे रस्ता बंद आहे, त्यामुळे पेपर स्टॉलसमोर व फलाटावर अघोषित पार्किंग झोन तयार झाल्यामुळे येणाऱ्या एसटी चालक-वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सुरक्षा वाऱ्यावर -
कळवण आगारासाठी सुरक्षा रक्षक असून, बसस्थानक परिसराच्या सुरक्षेला सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षा वाऱ्यावर असून, बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांचा वावर असल्यामुळे भाईगिरीला आळा बसला आहे.
कोट...
कळवण तालुका आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असल्यामुळे आदिवासी उपयोजनेतून कळवण बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडे दाखल करण्यात आला आहे. शिवाय ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावरदेखील बसस्थानकाच्या आधुनिकीकरण प्रस्ताव आमदार नितीन पवार यांच्या विचाराधीन असून, नवीन बस देण्याची मागणी केली आहे.
- हेमंत पगार, आगार व्यवस्थापक, कळवण
130921\13nsk_13_13092021_13.jpg~130921\13nsk_14_13092021_13.jpg
बसस्थानक~गळकी बस