ड्रीम प्रोजेक्टलाच पाटील यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:18 AM2019-11-30T01:18:09+5:302019-11-30T01:19:39+5:30
महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपत राजी- नाराजीचे सूर उमटण्यास प्रारंभ झाला असून, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो तसेच होऊ घातलेली शहर बस वाहतूक सेवा आणि मखमलाबाद येथील हरित क्षेत्र विकास प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (दि.२९) केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे या विषयावरील वादाला भाजपतच सुरुवात झाली आहे.
नाशिक : महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपत राजी- नाराजीचे सूर उमटण्यास प्रारंभ झाला असून, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो तसेच होऊ घातलेली शहर बस वाहतूक सेवा आणि मखमलाबाद येथील हरित क्षेत्र विकास प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (दि.२९) केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे या विषयावरील वादाला भाजपतच सुरुवात झाली आहे.
राज्यात आणि केंद्राची सत्ता असताना हे तिन्ही प्रकल्प नाशिकसाठी मंजूर झाले आहेत. त्यात मेट्रो निओ हा प्रकल्प देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रोचा प्रयोग असून २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी महापालिकेने जागा देणार असल्याने आर्थिक सहभाग मागू नये, अशी महापालिकेची भावना होती.
मात्र, राज्य शासनाने निर्णय घेताना नाशिक महापालिकेला १०२ कोटी रुपयांचा सहभाग देण्यास बाध्य केले आहे. मात्र, नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे.
महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यात येणार असून आता पाटील यांनी त्यास विरोध केला आहे. महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बससेवेसाठी अनेकदा निविदा मागवण्यात आल्या. परंतु प्रतिसाद मिळत नाही. मात्र ही खर्चिक योजना असून तोट्यात चालणारी सेवा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने विकासकामांना निधी प्राप्त होत नाही. अशा स्थितीत ही सेवा चालवणे खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे बससेवेचा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा त्यासाठी होणारा खर्च हा विकासकामांवर खर्च करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये असेदेखील पाटील यांनी नमूद केले आहे. त्यामुळे भाजपत आता वेगळे वाद सुरू झाल्याचे दिसत आहे.