लोकसहभाग : वीस गावांमध्ये शेळीपालनावर आधारित कार्यक्रम आदिवासी वस्त्यांमध्ये पाणीयोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:11 AM2018-04-02T00:11:17+5:302018-04-02T00:11:17+5:30
सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली
सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनांचे उद्घाटन संजय जोशी, संचालक, नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे, संचालक मनीषा पोटे, गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन मुंबई यांच्या सहयोगातून मागील तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्यामधील २० गावांमध्ये शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम, जमानदी खोरे विकास कार्यक्रम यासारखे ग्रामीण विकासाचे विविध उपक्रम राबवित आहे. सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणूनच ओळखला जातो, त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्यासाठी वर्षातील ४ महिने तालुक्यातील ४६ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. युवा मित्र संस्थेला काम करत असताना लक्षात आले की, पिण्याच्या पाण्याची समस्या ही आदिवासी वस्त्यांवर जास्त आहे. प्रत्येक बोअरवेल शेजारी ५००० लिटरची पाण्याची टाकी बसवून, पाइपलाइनद्वारे ती भरण्याची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी लाइटची व्यवस्था आहे तिथे मोटार बसवली व जिथे लाइट उपलब्ध नाही अशा ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहे. या योजनेमुळे वस्तीवरील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, त्याचबरोबर वस्तीवरील जनावरांचादेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. या योजनांमुळे सोनेवाडी येथील खाड्याची वाडी, कासारवाडी येथील वस्ती व कडाळे वस्ती, खंबाळे येथील भिल्ल वस्ती व बिरोबा वाडी, चास येथील ढोमाची वाडी या सहा वाड्यांमधील ४३३ कुटुंबांना व २१६५ शेळ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य नालंदा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने करण्यात आले तर श्रमदान व बांधकामासाठी लागणारे साहित्य स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पुरविण्यात आले.