मालेगाव : देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असणे ही गंभीर बाब आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात पाय पसरत असून, प्रशासनाबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढील पंधरा दिवस परिश्रम घेऊन कोरोनाचा पराभव करावा, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले.
ग्रामीण भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांची आढावा सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी अधिकारी किरण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अबुल फैजी, डॉ. दीपक निकम, डॉ. सपना बाविस्कर, डॉ. अमोल जाधव, डॉ. प्रांजल पाटील, डॉ. ऐश्वर्या पनपालीया, डॉ. निर्मलकुमार जगदाळे यांच्यासह या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की ‘घाबरू नका, पण काळजी घ्या’ हे ब्रीदवाक्य घेऊन जनजागृती करा आणि कामाला लागा, लोकप्रतिनिधींसह समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे लढा दिल्यास कोरोना संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. प्राथमिक पातळीवर उपचार घेतल्यास कोरोनाला तात्काळ अटकाव घालणे शक्य आहे. गृहविलगीकरणाच्या संकल्पनेवर अंकुश आणावा. गृहविलगीकरणातील रुग्णांनी स्वत:च्या कुटुंबीयांसह गावाची काळजी घेत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी व आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ समजून ग्रामपातळीवरील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सहयोग द्यावा. कोरोनाच्या संकटकाळातील प्रतिकूल परिस्थितीत ग्रामपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकासह आरोग्य कर्मचारी हे दरदिवशी गावात उपस्थित राहिले पाहिजे. जे कर्मचारी या निर्देशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.
चौकट
लवकरच २२ लाख लसींचा पुरवठा
जिल्ह्यासह तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असून, लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्नशील असून, लवकरच २२ लाख लसींचा पुरवठा होणार आहे. यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी नागरिकांनी देखील पुढाकार घेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही भुसे यांनी केले.
चौकट
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी भायगाव येथे १२० तर निमगाव येथे ५० बेडची सुविधा
तालुक्यातील भायगाव येथे शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी १२० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याबरोबरच निमगाव येथेही ५० बेडची अतिरिक्त सुविधा उपलब्ध असून, सामान्य रुग्णालयात १०० बेडचे आरक्षण ग्रामीण भागातील रुग्णांसाठी करण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.
ग्रामसमित्यांसह दक्षता समित्यांनी प्रभागनिहाय कोरोनाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे सांगताना मंत्री भुसे म्हणाले, तालुक्यात आज ७१ प्रतिबंधित क्षेत्र असून, सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र करंजगव्हान येथे ११०, वडनेर येथे ८५, रावळगाव येथे १४४ तर सौंदाणे येथे ६६ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे एकूण तालुक्यातील ग्रामीण भागात ६०८ रुग्ण असून, ही संख्या मर्यादित ठेवून, हे रुग्ण लवकरात लवकर बरी होण्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज एकाच वेळी सुमारे ८ हजार ४०० रुग्ण उपचार घेत आहेत, हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. सध्या मृत्यूदर कमी असला तरी तो वाढणार नाही, यासाठी गावागावात कोरोना चाचणीसह लसीकरणासाठी येणाऱ्या आरोग्य प्रशासनाच्या पथकाला सहकार्य करा. गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी गावातील शाळा, मंगल कार्यालयासारखे पर्याय शोधल्यास कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत होईल, असा विश्वासही डॉ. आहेर यांनी यावेळी व्यक्त केला.