नाशिक: राज्य परिवहन महामंडळ लॉकडाऊननंतर सावरत असले तरी अंतर्गत अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात बसेसची संख्या कमी असल्याने अनेक चालक- वाहकांना ड्युट्या मिळत नसल्याची चर्चा आहे. महिला वाहकांना तर सक्तीने सुटी घेण्याची वेळ आली असल्याने त्यांचे नुकसानदेखील होत आहे.
लॉकडाऊनपासूनच चालक- वाहकांना सर्वात मोठा फटका बसला आहे. अजूनही जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे ड्युट्या मिळणे आणि त्यामुळे सुट्या घेण्यास भाग पाडण्याच्या प्रकारावरून चालक-वाहकांची अनेकदा नाराजी समोर आलेली आहे. जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीला अपेक्षित प्रवासी मिळत नसल्यामुळे साहजिकच उत्पन्न मिळत असलेल्या मार्गावरच बसेस सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे बसफेऱ्यांच्या तुलनेत सर्वच चालक-वाहकांना ड्युट्या देणे शक्य होत नसल्याने प्रशासानालादेखील कसरत करावी लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका महिला कर्मचाऱ्यांना बसला आहे. त्यांना शेड्युलप्रमाणे कामगिरी मिळत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच मानव विकासच्या सुरू असलेल्या बसेस बंद असल्यामुळे महिला वाहकांना आणखीनच फटका बसला आहे. शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नसल्यामुळे या बसेस सुरू होऊ शकलेल्या नाहीत. या बसेसवर केवळ महिला वाहकांना ड्युटी द्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या हक्काची ही कामगिरी आहे. परंतु, खेड्यापाड्यातील आदिवासी भागातील शाळा बंद असल्याने या बसेसही बंदच आहेत. त्याचाही फटका महिला वाहकांना बसत आहे.
--इन्फो--
मुंबईतील चालक-वाहकही परतले
आता तर मुंबईतील बेस्टच्या कामगिरीसाठी पाठविण्यात आलेले चालक- वाहक नाशिकला परतल्याने त्यांनादेखील ड्युटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अगोदरच इतरांना कामगिरीचा फटका बसत असताना परतलेल्या चालक- वाहकांना कामगिरी देण्याबाबत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. अर्थात प्रशासनाने मात्र चालक- वाहकांना कामगिरी मिळत असल्याचे सांगून कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले आहे.