दातार जेनेटिकला पुन्हा तपासणीची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:27 AM2021-03-04T04:27:26+5:302021-03-04T04:27:26+5:30
याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांंगितले की, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त येत असल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक ...
याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांंगितले की, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त येत असल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा आयुक्त यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार लॅबचे कामकाज आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे होते आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी दातार जेनेटिकला नेाटीस बजावली होती. याप्रकरणी दातार कंपनीकडून १ मार्च रोजी स्पष्टीकरण देण्यात आले हेाते. या प्रकरणात तांत्रिक अधिकाऱ्यांसह सदर लॅबची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी अशी विनंती दातार जेनेटिककडून करण्यात आली होती. त्यानुसार प्रयोगशाळेचे कामकाज तसेच कोरोना व्यवस्थापनातील सांख्यिकी संदर्भातील कामकाज याची तांत्रिक माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येऊन सदर तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत लॅबची २ मार्च रोजी पाहाणी करण्यात आली.
प्रयोगशाळेचे कामकाज हा तांत्रिक विषय असल्यामुळे स्पष्टीकरणतील मुद्द्यांचा अभ्यास , त्याची योग्यता तसेच तांत्रिक पाहणीचे निष्कर्ष नोंदवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने ३ मार्च रोजी अहवाल सादर केला. या तांत्रिक समितीने अहवालात केलेल्या शिफारशीवर दातार कॅन्सर जेनेटिक यांनी कार्यवाही करावी असे तांत्रिक अहवालात नमूद करण्यात आले असून प्रयोगशाळा सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यानुसार स्वाब स्वीकृती व तपासणीचे कामकाज पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांना अनुमती देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
---इन्फो --
जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मार्च रोजी संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन आणि कागदपत्रांचे पुनर्वलोकन करून नवीन आदेश केला आहे. त्यानुसार कंपनीची कोविड-१९ ची लॅब पुन्हा सुर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. कोविडची सद्यपरिस्थिती पाहाता जनहिताच्या दृष्टीने प्रशासन आणि कंपनीमध्ये वाद सुरू राहाणे उचित नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांवरील अब्रूनुकसानीची नोटीस मागे घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे दातार जेनेटिकने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.