पेठ - मागील आठवडयात झालेल्या मुसळधार पावसाने पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. गावंधपाडा येथील यशवंत गवांदे यांनी निवृत्तीनंतर शेती विकसित करण्याचे धाडस केले. कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग करत त्यांनी इस्त्रायल पध्दतीने फळबाग लागवड केली होती. तीन वर्षापासून जवळपास अडीच लाख रु पये खर्च करून तयार केलेल्या बागेत या वर्षी पेरूच्या झाडांना बहार आला होता. मात्र मुसळधार पावसाने शेतातील सर्व बांध फोडून टाकले. त्यात पेरू, आंबा, काजू, बदाम, जांभूळ, लिंबू आदी अनेक झाडे वाहून गेले. शिवाय ऐन तोडणीला आलेले पेरूचे फळे तुटून खाली सडा पडला. बर्याच शेतकर्यांचे भात नागली सह टमाटे, भोपळे,कारले यांच्या बागा जमिनदोस्त झाल्याने अतिवृष्टीने शेतकºयांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी अहवाल सादर करावेत अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
पेठ तालुक्यात पेरूची बाग भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:59 PM