पाळीव प्राण्यांचा भरला मेळा; प्राणिप्रेमी नाशिककरांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 06:38 PM2018-01-07T18:38:18+5:302018-01-07T18:44:23+5:30
नासिक कॅनाइन क्लबच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘पेट-टुगेदर सिझन-५’चे. एकापेक्षा एक दुर्मीळ प्रजातीचे देशी-विदेशी पक्ष्यांसह श्वान आणि अश्वांचे दर्शन या राज्यस्तरीय ‘पाळीव प्राणी - पक्ष्यांच्या मेळ्यात एकाच छताखाली नाशिककरांना घडले.
नाशिक : प्राणी, पक्ष्यांचे माणसाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. या कुतूहलापोटी निसर्ग पर्यटनासाठी मनुष्यप्राणी बाहेर पडतो; मात्र जेव्हा एकाच छताखाली सीमेंटच्या जंगलात श्वान, मांजरी व पक्ष्यांच्या विविध जाती बघावयाची संधी उपलब्ध होते तेव्हा माणसांची गर्दी उसळणे स्वभाविक आहे. असेच काहीसे चित्र रविवारी (दि.७) शहरात पहावयास मिळाले.
रुबाबदार अश्व, दुर्मीळ प्रजातीचे विदेशी पक्षी व मांजरी आणि विविध प्रजातींचे तब्बल १८० श्वान व त्यांच्या गोंडस पिलांची जत्रा नाशिककरांनी अनुभवली. यानिमित्त शेकडो नाशिककरांनी सहकुटुंब रविवारची सुटी मुक्या निरागस मित्रांसमवेत ‘एन्जॉय’ करत त्यांच्यासोबत सेल्फी घेत आनंद लुटला. यावेळी मुक्या जिवांचा मनुष्यप्राण्याला लळा लागल्याचे दिसून आले.
निमित्त होते, नासिक कॅनाइन क्लबच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘पेट-टुगेदर सिझन-५’चे. एकापेक्षा एक दुर्मीळ प्रजातीचे देशी-विदेशी पक्ष्यांसह श्वान आणि अश्वांचे दर्शन या राज्यस्तरीय ‘पाळीव प्राणी - पक्ष्यांच्या मेळ्यात एकाच छताखाली नाशिककरांना घडले. या मेळ्याला नागरिकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला.
पेट टुगेदर अर्थात पाळीव प्राण्यांचे ‘गेट टुगेदर’ लवाटेनगर उंटवाडी परिसरातील ठक्कर डोममध्ये पार पडले. नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधून विविध पाळीव प्राणी, पक्ष्यांसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली होती. पाळीव प्राणी-पक्ष्यांचा भरलेला मेळा डोळ्यांत साठविण्यासाठी शेकडो नाशिककरांनी सकाळपासून गर्दी केली होती. यावेळी स्पर्धाही घेण्यात आल्या. या स्पर्धेत बंगाली मांजर सर्वोत्कृष्ट ठरली तर पर्शियन जातीच्या ‘लोला’ मांजरीने प्रथम तर मुट्टू या पर्शियन मांजरीचा दुसरा क्रमांक आला.
श्वान प्रात्यक्षिकांचा थरार
पेट टुगेदर मेळ्यात प्रथमच प्रशिक्षित श्वानांच्या प्रात्यक्षिकांचा अनुभव नाशिककरांनी घेतला. ‘कॉल’नुसार आज्ञा पाळणारे श्वान व त्यांच्या हालचाली बघून उपस्थित श्वानप्रेमी अवाक् झाले तर श्वानांचा प्रशिक्षकांवरच झालेला हल्ला अनेकांचा काळजाचा ठोका चुकवून गेला; मात्र यावेळी श्वानांच्या हल्ल्यापासून बचावासाठी संपूर्णपणे संरक्षणाची काळजी घेत तसा पोशाख परिधान केला होता.