नाशिक महापालिकेच्या ऑनलाइन महासभेत फिजिकल गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:28 PM2020-06-18T13:28:36+5:302020-06-18T13:31:25+5:30
ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला.
नाशिक - महापालिकेच्या महत्वपूर्ण विषयांसाठी बोलविण्यात आलेल्या ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला. सदरची सभा रद्द करून ती शुक्रवारी कालिदास कला मंदिरात द्यावी अशी मागणी करताना नगरसेवकांनी अत्यंत आक्रमक रूप धारण केले होते.
नाशिक महापालिकेची महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती गेल्यावेळी देखील अशा प्रकारची सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी फारश्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या नव्हत्या. मात्र आजच्या सभेत अत्यंत वादग्रस्त विषय असताना वारंवार तांत्रिक अडचणी आल्याने नगरसेवकांचे न दिसणे आवाजाचा गोंधळ असणे आणि चित्र न दिसणे अशा प्रकारचा गोंधळ सुरू झाला त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ही सभा तहकूब करण्याची मागणी केली मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते शिवसेना गटनेते विलास शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांच्यासह अन्य नगरसेवक महापौर ज्या ठिकाणी सभा संचालन करीत होते असते त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी तेथे गोंधळ घातला वादग्रस्त विषय मंजूर करण्यासाठी जाणीवपूर्वक तांत्रिक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच गजानन शेलार यांनी महापौरांवर टक्केवारीसाठी सभा बोलावल्याचा आरोप केला शहरात कोरोना मुळे गंभीर स्थिती असताना अशा प्रकारे सभा बोलावण्याची गरज काय असा प्रश्न त्यांनी केला दरम्यान, अन्य नगरसेवकांनी ही सभा रद्द करून कालिदास कला मंदिर यामध्ये शुक्रवारी सकाळी नियमित वेळेत फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून घ्यावी अशी मागणी केली. हा गोंधळ बघून महापौर सतीश कुलकर्णी यांनी तांत्रिक दुरुस्तीच्या निमित्याने महासभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब केल्याचे जाहीर केले