ओझर : कथित वेतन भत्ता परस्पर लाटल्याप्रकरणी शनिवारी (दि. ३०) पिंपळगाव बाजार समितीत सत्ताधारी संचालक मंडळाची तातडीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीस सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना बोलावले नसल्याने बाजार समितीतील राजकारण तापले आहे. तर या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईचा इशारा सभापती दिलीप बनकर यांनी बैठकीत दिला.दरम्यान, बैठक गाजली ती कथित वेतन भत्ता परस्पर लाटल्याप्रकरणी. यावेळी ज्यांचे सचिव पाटील यांच्याकडून काही पैसे घेणे आहेत त्यांनी अर्ज करण्याचे आवाहनही करण्यात आले. पिंपळगाव बाजार समितीचे कर्मचारी असलेल्या मयत पारस कोचर यांची सातव्या वेतन आयोगाची फरक रक्कम त्यांच्या वारसांना न देता ती परस्पर लाटल्याप्रकरणी सचिवांविरोधात रोष निर्माण झाला आहे. याबाबत ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलेल्या गैरकारभाराच्या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हलाखीच्या परिस्थितीत मयत झालेल्या पारस कोचर यांचे हक्काचे पैसे लाटले गेल्याने शेतकऱ्यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर सचिवांविरोधात कुणाची काही तक्र ार आहे का? आणखी कुणाचे हक्काचे पैसे त्यांनी लाटले आहे का, असा सवाल सभापती बनकर यांनी विचारला. यावेळी उपसभापती दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, निवृत्ती धनवटे, गुरु देव कांदे व सचिव संजय पाटील उपस्थित होते. मात्र, विरोधी गटातील सदस्य असलेल्या चिंतामण सोनवणे, केशव बोरस्ते व भास्करराव बनकर सदर बैठकीला उपस्थित नव्हते. दरम्यान, कुठल्याही बैठकीची पूर्वसूचना सभापती किंवा उपसभापती हे सचिवांना देतात़ याप्रमाणे शनिवारी झालेल्या बैठकीचे निमंत्रण सचिवांनी देणे क्रमप्राप्त होते़ यात सत्ताधारी संचालक मंडळाचा दोष नाही, असे उपसभापती दीपक बोरस्ते यांनी सांगितले़
सचिव संजय पाटील यांनी केलेल्या या कथित प्रकरणामुळे अस्वस्थ झालो आहे. तात्पुरते निलंबित केलेल्या कर्मचाºयाचे वेतन मागच्या महिन्यात त्यांनी दुसºया कर्मचाºयाच्या खात्यावर टाकले. असा अधिकार त्यांना नेमका दिला कुणी? अशा कारभाराला कंटाळून मी सभापतींकडे राजीनामा दिला. सचिव पाटील यांची चौकशी केल्यास अनेक प्रकरणे उघड होतील.- गोकुळ गिते, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती
आम्ही विरोधी गटाचे संचालक आहोत. संचालक मंडळाने घेतलेल्या बैठकीत विरोधी संचालकांना का बोलावले गेले नाही हा मुख्य मुद्दा आहे. आजपर्यंत झालेले अनेक निर्णय असेच चार-पाच लोकांमध्ये घेण्यात आले आहेत. बाजार समितीतून आजच्या बैठकीबाबत कोणताही संपर्कझाला नाही.- केशव बोरस्ते, संचालक, पिंपळगाव बाजार समिती