सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग उद्योगांनी प्रक्रिया केलेले पाणी पुनर्वापर करण्यासाठी झेडएलडी किंवा आरओ प्रकल्प उभारला नसल्याचे कारण देऊन १५ उद्योगांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे हे उद्योग बंद पडले आहेत. परंतु यातील बहुतांश उद्योगांनी झेडएलडी किंवा आरओ प्रकल्प उभारला आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने प्लेटिंग उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंदारे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. तरीही कारवाई मागे घेण्यात न आल्याने मेटल फिनिशर्स असोसिएशनचे सचिन तरटे, आशिष कुलकर्णी, समीर पटवा, सुदर्शन डोंगरे, धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. पालकमंत्री भुजबळ यांनी हा विषय गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्लेटिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
इन्फो ===
प्लेटिंग उद्योगांवर केलेल्या कारवाईबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी उद्योगमंत्री व पर्यावरणमंत्री यांना तत्काळ पत्र पाठविण्याचे निर्देश त्यांच्या सचिवांना दिले. तसेच एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्लेटिंग उद्योग संघटना यांनी लवकरात लवकर एकत्रित बैठक घेऊन (सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) सीईटीपी प्रकल्पाबाबत निर्णय घ्यावा आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे सूचित केले.
(फोटो ३१ भुजबळ) एमपीसीबीने कारवाई केल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन कैफियत मांडताना प्लेटिंग उद्योग संघटनेचे सचिन तरटे, आशिष कुलकर्णी, समीर पटवा, सुदर्शन डोंगरे, धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे.