नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपनिमित्त होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेदरम्यान आंदोलकांची धास्ती बाळगत सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आल्याने सभेस आलेल्या श्रोत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पंचवटीत तपोवन परिसरात अटल नगरी उभारण्यात आली असून, पावसाची शक्यता लक्षात घेऊन 12 वॉटर प्रूफ डोम उभारण्यात आले आहे. व्यासपीठाकडे जाणाऱ्या चारही बाजुंनी मेटल डिटेक्टर मधून तपासणी करूनच नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. पाण्याच्या बाटल्या, बॅग, पेन, कंगवे, तत्सम वस्तू काढून सभामंडपात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्रचंड खोळंबा होत आहे. सुरक्षा तपासणीत वेळ जातो आहे, लोकांना सभास्थळी येऊ द्या म्हणून व्यासपीठावरून वारंवार उद्घोषणा केली जात आहे, पण सुरक्षा यंत्रणा धोका पत्करायला तयार नाही, मुंबईतील भाजप नेते, किरीट सोमय्या यांचेही वाहन पोलिसांनी अडविले.
दरम्यान मोदी यांना आपल्या पेन्शन प्रकरणी निवेदन देण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस स्टेशनात नेण्यात आले आहे, तर छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनाही सकाळी सभास्थळी ताब्यात घेण्यात आले आहे. काळे कपडे घातलेल्यांबरोबरच सोबत काळे हेल्मेट असलेल्यानंही सभास्थळी प्रवेश नाकारला जात आहे.
नागरिकांच्या सेक्टर प्रवेशद्वारावर एका ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकाला अडविले असता त्याची झडती घेऊन चुना डबी जप्त केली गेली, मग जेष्ठ थोडेसे उद्विग्न सुरात म्हणाले, चुना नाही तंबाखू खाऊ कशी? हे ऐकून सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना आपले हसू लपविता आले नाही. बाबा, काय करणार मोदी साहेब येत आहेत...असे सांगून त्या वृद्धाची समजूत काढण्याचा प्रयत्न बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी केला. अखेर बाबा, हात झटकून मग कोरडी तंबाखू खात मोदींचे भाषण ऐकतो असे म्हणून पुढे सभामंडपात निघून गेले.