नाशिक : जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. नाशिकचे कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे या प्रकाशन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगनाथ पाठारे यांनी कवी राजू देसले यांनी लिहिलेल्या कविता या मराठी साहित्याला मिळालेल्या नवीन दमाच्या आणि नव्या प्रकारातील कविता असून या कवितांच्या शब्दाशब्दात फटकारे असल्याचे सांगितले. त्यात शब्दांच्या पलिकडे जाण्याची असोशी असल्याचे सांगितले. अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांनी कवी राजू देसले हे नाशिकचा चालताबोलता संदर्भ असल्याचे सांगितले. अभिनेते तथा लेखक दीपक करंजीकर यांनी ज्याच्या चिंतनात अखंड माणसं आहेत, अशा व्यक्तीकडून येणारी कविता वेगळीच असते, अशी आशा व्यक्त केली. प्रवीण बांदेकर,मंगेश काळे, गोविंद काजरेकर, सरबजीत गरचा यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर विश्वास समूहाचे प्रमुख विश्वास ठाकूर, प्रवीण बांदेकर, मंगेश काळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश होळकर यांनी केले.
मराठी लादणे चुकीचे अलिकडच्या काळात मराठी भाषेसंदर्भात राजकीय पक्षांकडून मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आणि मराठी साहित्य विक्रीला ठेवण्यासाठी आंदोलने केली जातात. हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण असल्याचे सांगत मराठी पण सिध्द करायची गरज भासायला नको, हा व्यवसाय असून याप्रकारे मराठी भाषा लादणे चुकीचे ठरेल असे परखड मत रंगनाथ पठारे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव घेता मांडले.