लोकमान्य टिळकांवर रचली कवी गोविंदांनी चार कवने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:00 AM2020-08-01T00:00:13+5:302020-08-01T00:58:43+5:30
नाशिक : भारतीय असंतोषाचे जनक म्हणून गौरवल्या गेलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जननायकाच्या उत्तुंग कर्तृत्वाचे गुणगान करणारी चार कवने नाशिकचे तत्कालीन प्रख्यात कवी गोविंद दरेकर यांनी रचली होती. टिळकांच्या जीवनातील चार विभिन्न प्रसंगांवर त्यांनी रचलेली ही कवने त्यावेळच्या मेळ्यांमध्ये मोठ्या हिरीरीने गायलीदेखील गेली.
नाशिक : भारतीय असंतोषाचे जनक म्हणून गौरवल्या गेलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जननायकाच्या उत्तुंग कर्तृत्वाचे गुणगान करणारी चार कवने नाशिकचे तत्कालीन प्रख्यात कवी गोविंद दरेकर यांनी रचली होती. टिळकांच्या जीवनातील चार विभिन्न प्रसंगांवर त्यांनी रचलेली ही कवने त्यावेळच्या मेळ्यांमध्ये मोठ्या हिरीरीने गायलीदेखील गेली.
कवी गोविंद आणि त्यांच्या मित्रांचा सन्मित्र समाज मेळा हा त्याकाळी नाशिकमध्ये प्रचंड गाजत होता. कवी गोविंद यांनी रचलेले ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे काव्य तर सर्व काव्यांचा कळसाध्याय ठरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवलग मित्र असलेले कवी गोविंद हे पायाने पूर्ण पांगळे पण स्वातंत्र्याचा विचार धगधगता ठेवणारे क्रांतिकारी कवी होते. त्यांचा सन्मित्र समाज मेळा १९०५ साली टिळकांनी आयोजित केलेल्या कवन स्पर्धेत विजेता ठरला होता. त्यावेळी झालेल्या टिळकांच्या दर्शनाने प्रेरित झालेल्या कवी गोविंद यांनी त्यांच्या जीवनावरील चार विविध प्रसंगांवर कवने रचून ती मेळ्यांमधून गायलीदेखील होती. त्यांनी सर्वप्रथम टिळकांवर ‘आर्यावर्ताचे अनभिषिक्त भूपती’ हे कवन सर्वप्रथम रचून त्यांच्या मेळ्यातून अनेकदा गायले. १९०८ साली टिळक यांना शिक्षा झाल्याने कळवळलेल्या कवी गोविंद यांनी ‘आमुचा वसंत कोणी नेला?’ हे दुसरे कवन रचले, तर टिळकांच्या एकसष्ठीनिमित्त ‘जय जय टिळका, अपार समर्था, वीराधी भास्करा शुभंकरा’ हे तिसरे कवन रचले, तर १ आॅगस्ट १९२० रोजी टिळकांनी देह ठेवल्यावर कवी गोविंदांनी त्यांच्या दहाव्या दिवशी ‘कोठे जाशी राष्टÑप्राणा, धर्मत्राणा, परदास्याच्या मरणा, गेला राष्टÑ तात तो गेला, गेला राष्टÑ जनक तो गेला, गेला राष्टÑ प्राण तो गेला’ हे काव्य रचून टिळकांना काव्यसुमनांजली अर्पित केली होती.
टिळक होते नाशिकचे व्याही
लोकमान्य टिळकांचे ऋणानुबंध नाशिकशी जुळलेले होते. नाशिकच्या तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष विश्वनाथ केतकर यांचे सुपुत्र ग. वि. केतकर यांच्याशी टिळकांच्या कन्येचा विवाह झाला होता. त्यामुळे नाशिकचे व्याही झालेल्या टिळक यांचा सामाजिक कारणाबरोबरच कौटुंबिक कारणातूनही नाशिकशी स्नेह जुळलेला होता. नाशिकला गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी टिळकांच्या अनेकदा बैठका तसेच एक सभादेखील नाशिकला झाली होती.
लोकमान्य टिळकांसारख्या महान जननायकाच्या केवळ दर्शनाने स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्या प्रतिभेला बहर आला होता. त्यांच्या चार कवनांनी या सर्वश्रेष्ठ राष्टÑभक्ताला वाहिलेली काव्य सुमनांजली अजरामर ठरली आहे. - प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी, ज्येष्ठ अभ्यासक