नाशिक : नागरिक-पोलीस हितसंबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, जेणेकरून गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल, या उद्देशाने परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या परिसरात दररोज संध्याकाळी वरिष्ठ अधिकारी पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी ह्यजवळीकह्ण साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.शहर व परिसरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी परिमंडळ हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्मचारींसह निवडलेल्या ठराविक परिसरात संध्याकाळी दोन तास पायी गस्त घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ठराविक पोलीस ठाणे आणि त्या परिसरात पोलीस रस्त्यावर फिरताना दिसून येणार आहे.पायी गस्त घालताना परिसरातील डॉक्टर, दुकानदार यांसह नागरिकांशी संवाद साधून कायदा सुव्यवस्थेचा आढावा पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपद्रवी असणार्या समस्या जाणून घेत त्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सलग पंधरा ते वीस दिवस परिमंडळ दोनच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हा उपक्रम दररोज दोन तास राबविला जाणार असल्याचे ढिवरे यांनी सांगितले. सोमवारी (दि.७) संध्याकाळी साडेसहा वाजता धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे हे सातपूर, इंदिरानगर आणि सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तास पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही संध्याकाळी दररोज आपापल्या हद्दीत पायी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे धिवरे म्हणाले. (प्रतिनिधी)
जनसामान्यांमध्ये प्रतिमा उंचविण्यास पूरक
नागरिकांशी सुसंवाद वाढविण्यासाठी आणि शहरातील गुन्हेगारीचा नागरिकांच्या मदतीने बिमोड करण्यासाठी शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अँप क्रमांक जाहीर करून नाशिककरांच्या आणखी जवळ जात ‘संपर्क’ वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दररोज सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संध्याकाळी दोन तास पायी गस्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकूणच शहर पोलिसांकडून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या मनात असलेली पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासदेखील असे उपक्रम पूरक ठरणार असल्याचा आशावाद पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.