नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडवर एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मखमालाबादरोडवर आणि काठेगल्लीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानी हिसकावून नेली होती. तसेच तत्पूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही तोच आता पुन्हा मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पखालरोडवर श्री अय्यपा मंदिराजवळ अर्चना अतुल अन्नदाते (४५, रा.गुरू अय्यपन अपार्टमेंट, खोडेनगर) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सुमारे २५ ग्रॅमची सोनसाखळीतील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने आलेला चोरटा फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून पुढे अशोका पोलीस चौकीकडे सिग्नलवर बॅरिकेड टाकून रस्ता आठ वाजताच बंद केला जातो तरीदेखील सोनसाखळी हिसकावून नेणारा चोरटा निसटून जाण्यास यशस्वी ठरला. अन्नदाते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी बॅरिकेड टाकून रस्ते बंद केले जात आहे.
पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 1:20 AM