पंचवटी : महिलेच्या मोबाइलवर मेसेज टाकल्याच्या कारणावरून धुळ्याच्या युवकाचे अपहरण करून त्याचे मुंडण करणाऱ्या पुण्याच्या संशयिताना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
दोन दिवसांपूर्वी दिंडोरी रोडवर मायको दवाखान्यामागे एका युवकाला महिला व पुरुष मारहाण करून त्याचे डोक्यावरचे केस कापून मुंडण करत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता, पुणे कोथरूड येथील एका महिलेच्या मोबाइलवर धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेला विलास चव्हाण हा आक्षेपार्ह मेसेज पाठवत असल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी धुळे येथून चारचाकी वाहनात बसवून नाशिकला फुलेनगरला आणून एका सलून दुकानात त्याचे मुंडण केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी पुणे येथील जयसिंग कौर छाबडा, सोनाली राहुल निंबाळकर, राहुल दिगंबर निंबाळकर, नीलेश सुरेश जाधव, सागर शिवाजी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल त्यांना अटक केली होती. सर्व संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.