सिडको : अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या ‘काव्य कोजागरी’ या हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवींनी बालक तसेच वयोवृद्धांवर अनेक मराठी व हिंदी कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे व त्यांच्या टीमने पोलीस कुटुंबीयांसाठी काव्य कोजागरी हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवींच्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विविध कवितांनी अंबड पोलीस ठाण्याचे वातावरण उल्हासित झाले होते. कवींनी सादर केलेल्या कवितांना तितक्याच प्रमाणात उपस्थितांकडून दादही मिळत होती. याप्रसंगी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त माधुरी कांगने, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड, दिनेश बर्डेकर, राजेंद्र कुटे, करंजे, तुषार चव्हाण आदींसह पोलीस कर्मचाºयांची कुटुंबे उपस्थित होती. याप्रसंगी कवींनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. त्यात बैलागत राबणारा बाप गाईगत होता । हात त्याचा खरबुडा आईगत होता ।।सारं फुकाच वाटून, बाप माझा झाला तुका । शिळं कुडकं खाऊन आम्ही जगविल्या भुका।। त्याचप्रमाणे ‘मॅडम तुम्ही फार छान दिसता, जितक्या छान दिसता, त्यापेक्षाही छान तुम्ही हसता ।। ’ ‘तूच माझी शान आणि तूच आमचा मान रे । तूच अस्मिता आणि तूच आमचा प्राण रे ।।’ याशिवाय ‘चिमणीच्या जोडीला घरापुढे कावळा होता । कधी काळी माणसाला पाखरांचा लळा होता ।।’ आणि ‘जिथं फाटते तिथंच ओवावा धागा । गं बाई दु:खाच्या कष्टाने लिपाव्या भेगा ।।’ अशा अनेक कवितांना दाद मिळाली.
पोलीस कुटुंबे रंगली हास्य काव्यसंमेलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:27 AM