चिश्ती यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या बँक खात्यांवर पोलिसांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 01:46 AM2022-07-09T01:46:31+5:302022-07-09T01:46:51+5:30
येवला येथील चिचोंडी एमआयडीसी परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आलेले अफगाणी जरीफ चिश्ती यांच्या अर्थपुरवठा करणाऱ्या विविध बँक खात्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे चिश्ची यांच्या यू-ट्यूब चॅनलवरील व्हिडिओ व अन्य मजकुराच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, अशा सर्व खात्यांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे.
नाशिक : येवला येथील चिचोंडी एमआयडीसी परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आलेले अफगाणी जरीफ चिश्ती यांच्या अर्थपुरवठा करणाऱ्या विविध बँक खात्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे चिश्ची यांच्या यू-ट्यूब चॅनलवरील व्हिडिओ व अन्य मजकुराच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, अशा सर्व खात्यांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे.
जरीफ चिश्ती यांनी भारतात तीन कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याची बाब तपासात पुढे आली असून, याच वादातून बाबांचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यासाठी नाशिक स्थानिक गुन्हे शाखा, येवला पोलीस गुन्हे शोध पथकासह तीन पथके हल्लेखोरांच्या मागावर आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून जरीफ चिश्तीच्या मृत्यूबाबत अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावास कार्यालयालाही माहिती देण्यात आली असून, पुढील तीन दिवसांत चिश्ती यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक नाशिकमध्ये येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तोपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात जतन करून ठेवण्यात आला आहे.
मालमत्तांचे व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी
चिश्ती निर्वासित असतानाही त्यांनी जमवलेली संपत्ती व विविध जंगम मालमत्तांचे व्यवहार आता पोलिसांनी तपासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत असून, ज्या सेवेकऱ्यांच्या नावाने व्यवहार करण्यात आले त्यांच्यासह देशांतर्गत व परदेशातून मिळालेल्या अर्थसाहाय्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.