नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बहिणीला केले लक्ष्य; हिसकावले आठ तोळ्यांचे दागिने
By अझहर शेख | Published: September 29, 2022 05:10 PM2022-09-29T17:10:27+5:302022-09-29T17:11:01+5:30
मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे दोन मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. या महिलेच्या नात्यातील दोन भाऊ पोलीस दलात अधिकारी असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नाशिक : नाशिक शहर व परिसरात नवरात्रोत्सवात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा अशीच एक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे दोन मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. या महिलेच्या नात्यातील दोन भाऊ पोलीस दलात अधिकारी असल्याचे सुत्रांनी सांगितले.
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारकेववरील माणेकशा नगर येथील रहिवाशी असलेल्या अनिता तानाजी तांबे (५४) या हिरावाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी जात होत्या. दुचाकीवरून जाताना महिलेच्या गळ्यातील तब्बल आठ तोळ्यांची अडीच लाख रुपये किंमतीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून पळ काढला. ही घटना बुधवारी (दि.२८) भरदुपारी हिरावाडीमधील महापालिकेच्या मिनाताई ठाकरे क्रिडा संकुलाजवळील रस्त्यावर घडल्याचे फिर्यादीत तांबे यांनी म्हटले आहे.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास तांबे या त्यांच्या सुनेसोबत एक्टिवा दुचाकीने हिरावाडीत राहणाऱ्या नातेवाईकाच्या जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोघा चोरांनी तांबे यांच्या जवळ येऊन गाडी हळु केली. यावेळी पाठीमागे बसलेल्या चोराने त्यांच्या गळ्यात एक सहा तोळे व दुसरी दोन तोळे वजनाच्या सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. यप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोराविरूद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी याप्रकरणी गुन्हे शोध पथकाला तपास करत गुन्हेगारांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.