नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक चांदवड टोलनाक्यावर गुरुवारी रात्री बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. एका बोलेरो जीप मधुन अवैधरीत्या शस्रासाची वाहतुक करताना तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातुन 19 पिस्तुल, 24 रायफल्स व चार हजार 136 काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून रात्री उशिरा विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी चांदवड पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी सकाळ पर्यंत कारवाई सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच 01 एस. ए. 7460 हि डिझेल भरण्यासाठी आली होती. पंप कामगाराने जीप मध्ये 2700 रुपयाचे डिझेल भरले. जीप चालकाने पैसे न देताच पोबारा केला. सदर घडलेल्या प्रकार तालुका पोलिसांना कळविताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी सदर गाडीची माहिती चांदवड पोलीसांना बिनतारी संदेशाद्वारे कळविण्यात आली. चांदवड टोलनाक्यावर जीप अडविण्यात आली असता जीप मधील प्रवाशाने पिस्तुलाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला.
परंतु दुर्दैवाने तो फोल ठरला व पोलीसांनी गाडीसह तिघांना चांदवड पोलीस ठाण्यात आणले. त्यांची व जीपची कसून तपासणी केली असता जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने यात काही तरी असल्याची शंका बळावल्याने तपासणी केली असता त्यातुन 17 रिव्हॉल्व्हर, दोन विदेशी पिस्टल, 24 रायफल्स, 12 बोअरची चार हजार 136 काडतुसे व 32 बोअरची 10 काडतुसे हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (23)रा.वडाळा जिल्हा नाशिक, सलमान अमानुल्ला खान (19)रा. शिवडी मुंबई, बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (27)शिवडी मुंबई यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील कानपुर येथील एका शस्रास गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असल्याची माहिती दिली. पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी याबाबत कानपूर पोलीसांशी संपर्क साधून माहितीची शहानिशा केली असता तेथून एकुण 250 शस्त्रास्त्रे चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे.
यात आणखी काही जणांचा समावेश आहे का यादृष्टीने पोलीसांनी तपास सुरू केला असून तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या कडुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.