नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाऱ्या संशयितांचे वाहन अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात नाशिकपोलिसांना यश आले आहे.नाशिक शहरातील पंचवटी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून यात पेठ येथील संशयित शंकर येवला (31) याला ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी शहर वाहतूक शाखेचे झेब्रा पथक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश माळवाल, राजेंद्र जाधव, अनंत गारे, अमोल काळे असे मुंबई-आग्रा महामार्गावरील सबिहारी चौक परिसरात गस्त घालत असताना त्यांना आडगाव कडून एक महिंद्रा मार्शल (एमएच 15 आर 3775) येताना दिसली. संबधित चारचाकी वाहन वाहतूक पोलिसांना बघून संशयास्पदरीत्य रस्त्यात थांबत जाऊ लागल्याने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी संबधित वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनचालक येवला याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटखा आढऴून आल्याने पोलिसांनी येवलासह चार चाकी वाहन व गुटखा असा तीन ते चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येवला पोलिसांना चकवा देत रासबिहारी चौकातून सिडकोकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सदर घटनेबाबत दुपारी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देत पंचनामा केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयितांना आडगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अन्न औषध प्रशासनाविषयी साशंकतानाशिक शहरात दररोज लाखो रुपये किंमतीचा गुटखा चोरी छुप्या पद्धतीने आणला जात असला तरी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला याची कोणत्याही प्रकारचा सुगावा लागत नाही. शिवाय संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने नाशिक शहरात बहुतांश दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होताना दिसून येते. मात्र या बाबत अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामगिरीबाबत साशंका व्यक्त होतआहे.