वन गुन्हे रोखण्यासाठी पोलीसपाटलांची घेणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:47 AM2021-02-05T05:47:49+5:302021-02-05T05:47:49+5:30
नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही वनसंपदा व वन्यजिवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने विविध उपाययोजना वन आणि ग्रामीण पोलीस संयुक्तरित्या करणार आहे. ...
नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही वनसंपदा व वन्यजिवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने विविध उपाययोजना वन आणि ग्रामीण पोलीस संयुक्तरित्या करणार आहे. वनविभागापुढे असलेल्या विविध मर्यादा तोकडे मनुष्यबळासह अन्य यंत्रणेमुळे वन्यजीवांसह वनगुन्हे रोखताना या विभागाची दमछाक होते. यामुळे गाव, तालुकापातळीवर वनक्षेत्रपाल, वनपाल यांना जवळच्या पोलीस ठाण्यांमार्फत सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सोमवारी (दि. १) अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, विभागीय वनअधिकारी स्वप्नील घुरे, वनक्षेत्रपाल बशीर शेख, महेंद्र पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, येवला, इगतपुरी या तालुक्यांमध्ये वनसंपदा टिकून आहे. तसेच या भागात वन्यजिवांचाही वावर आढळून येतो. प्रामुख्याने बिबट्या, तरस, कोल्हा, लांडगे, काळवीट यांसारखे वन्यजीव आढळून येतात. जिल्ह्यातील वरील सर्व तालुक्यांमधील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षकांनी वनक्षेत्रातील वनपरिमंडळांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी मदत उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली.
--इन्फो--
पोलीस-वनविभाग घेणार एकत्रित ‘ॲक्शन’
वन्यजीव संवर्धनाविषयी उपाययोजना, वन्यजीवांची शिकारीवर नियंत्रण, वन्यजिवांच्या अवशेषांची तस्करींसह कृत्रिम वणवे, अवैध वृक्षतोड, जंगलातील अतिक्रमण रोखण्याविषयी चर्चा झाली. सीमावर्ती भागात आदिवासी तालुक्यांमध्ये प्रामुख्याने जंगल व वन्यजीवसंपदा असून, या भागात वन-वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी उपाय वन आणि पोलीस खात्यांकडून एकत्रितपणे करण्यावर मंथन करण्यात आले आहे.