नाशिक परिक्षेत्राच्या उपमहानिरीक्षकपदाचा पदभार शेखर यांनी नुकताच स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाशिक परिक्षेत्र हे तसेच माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही नाशिकमध्ये सेवा बजावल्याचा अनुभव आहे. नाशिकला गुजरात, मध्य प्रदेशसारख्या राज्यांच्या सीमा जवळ आहे. यामुळे आंतरराज्यीय गुन्हेगारांचा शिरकाव हे पोलिसांपुढील आव्हान नक्कीच आहे; मात्र सर्वच जिल्ह्यांचे पोलीस दलच यासाठी सतर्क असून सीमावर्ती तपासणीनाके अधिकाधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रीदनुसार पोलीस दल कार्यरत राहणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास देत कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही शेखर यांनी दिला.
--इन्फो--
‘रौलेट’ची पाळेमुळे उखडून फेकणार
रौलेट बिंगो नावाचा फोफावणारा ऑनलाइन जुगार शहरासह ग्रामीण भागांमधून उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष योजना तयार केली जाणार आहे. नाशिक परिक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यांमधून या जुगाराची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे. तरुणांनी अशा जुगार खेळण्यापासून आणि खेळविणाऱ्यांपासून स्वत:ला लांब ठेवावे, असेही आवाहन त्यांनी केले.
--इन्फो--
खासगी सावकारी फोडून काढणार
नाशिक परिक्षेत्रात फोफावणारी खासगी सावकारी पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी लबाड व्यापाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. पूर्वेतिहास बघता नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत, यामुळे नाशिक पोलीस अधीक्षकांना याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
--इन्फो--
पोलीस साहित्य संमेलन भरविणार
पोलीस दलामध्येही विविध कलागुण दडलेले असतात. बहुतांश पोलीस अधिकारी, कर्मचारी हे पडद्यामागील कलावंत असतात. त्यांच्यातील कलावंत जागा ठेवण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता आगामी काळात नाशिक परिक्षेत्राकरिता ‘पोलीस साहित्य संमेलन’ भरविण्याचा मानसही शेखर यांनी यावेळी व्यक्त केला. २०१९ साली राज्यातील पहिले पोलिसांचे संमेलन मुंबईत घेतले होते. त्याचीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
..
010921\01nsk_28_01092021_13.jpg
बी.जी. शेखर