पंचवटी प्रभाग सभापतिपदी भाजपाच्या पूनम धनगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:20 AM2018-04-22T00:20:56+5:302018-04-22T00:20:56+5:30
पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी भाजपाच्या पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवटी प्रभागात सत्ताधारी भाजपाचे तब्बल १९ नगरसेवक असल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
पंचवटी : पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी भाजपाच्या पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवटी प्रभागात सत्ताधारी भाजपाचे तब्बल १९ नगरसेवक असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. शनिवारी दुपारी पंचवटी विभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधाकृष्णन बी. यांनी काम बघितले. सुरुवातीला अर्ज छाननी व नंतर माघारी मुदत आटोपल्यावर धनगर यांचा एकमेव अर्ज आल्याने राधाकृष्णन यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी महापौर रंजना भानसी, गणेश गिते, अरुण पवार, माजी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, उद्धव निमसे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, पूनम सोनवणे, सरिता सोनवणे, भिकूबाई बागुल, पुंडलिक खोडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धनगर यांची बिनविरोध निवड होताच महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती हिमगौरी आडके-अहेर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
विरोधक गैरहजर
पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदी भाजपाच्या सदस्याची वर्णी लागणार असल्याने व त्यातच एकमेव अर्ज आल्याने सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी दांडी मारली, तर शिवसेना, अपक्ष तसेच मनसेच्या लोकप्रतिनिधींनी प्रभाग सभापती निवडणुकीला गैरहजर राहणे पसंत केले.