इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर दुभाजकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:43+5:302021-05-09T04:15:43+5:30

नाशिक : इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर दुभाजकांवरील शोभेच्या वनस्पतींना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. दुभाजकांवरील शोभेची रोपे वाळून ...

Poor condition of dividers on Indiranagar-Pathardi road | इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर दुभाजकांची दुरवस्था

इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर दुभाजकांची दुरवस्था

Next

नाशिक : इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर दुभाजकांवरील शोभेच्या वनस्पतींना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. दुभाजकांवरील शोभेची रोपे वाळून त्या जागेवर गवत वाढल्याने याठिकाणी रोपांची पुनर्लागवड करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

--

ग्रामीण भागात खरिपाची तयारी

नाशिक : शहरालगतच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनच्या उत्कृष्ट बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे, तर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या विश्वासार्ह कंपन्यांचे बियाणे आवश्यकतेनुसार खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

--

शहरासह उपनगरांमध्येही विजेचा लपंडाव

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा लंपडाव सुरू असल्याने परिसरात घरूनच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह दहावी व बारावीचा ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे.

---

महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका परिसरातून वाडीवऱ्हे, घोटी, कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांची अवैध वाहतूक सुरू आहे. द्वारका परिसरातून खासगी विनापरवानाधारक वाहनांतून प्रवाशांची वाहतूक सुरू असून, परवानाधारक वाहनांमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवशांची वाहतूक केली जात असताना परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

---

मास्कला मागणी वाढली

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याने मास्कला मागणी वाढली आहे. वाढता प्रसार रोखण्यासाठी काही डॉक्टर दोन मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अनेकांनी एकावर एक असे दोन मास्क वापरण्यास सुरुवात केली असून, कोरोनाच्या भीतीने विविध प्रकारच्या मास्कची खरेदी वाढली आहे.

--

शरयूनगर रस्त्यावर वाढले अतिक्रमण

नाशिक : पाथर्डी-इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत टपरीधारकांसह विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. या भागातील विक्रेत्यांकडून रस्त्याच्या कडेलाच कचरा फेकला जात असल्याने या भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

---

शहरातील सीडीएम बंद

नाशिक : शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून एटीएममध्ये अनेकदा रक्कम मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे बँकांमधील गर्दी वाढत असून, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बँक प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने कसरत करावी लागत आहे.

--

गंजमाळ रस्त्याच्या दुभाजकाची दुरवस्था

नाशिक : साराडा सर्कल ते गंजमाळ परिसरातील रस्त्यावरील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. दुभाजकावरील शोभेच्या वनस्पती पाण्याअभावी वाळल्या आहेत. दुभाजकावरील खुल्या जागेत कचरा फेकला जात असल्याने दुभाजकाची दुरवस्था झाली असून, परिसरातील नागरिकांकडून पुन्हा दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याची मागणी होत आहे.

---

स्टेशनरी साहित्याला मागणी वाढली

नाशिक : शहरासह जिल्हाभरातील शाळा बंद असल्या तरी दहावी आणि बारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक प्रात्यक्षिक पुस्तिका व अन्य स्टेशनरी साहित्याला मागणी वाढली आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत दुकाने बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

-

Web Title: Poor condition of dividers on Indiranagar-Pathardi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.