लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : मेशी-मेशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.मागील वर्षीच्या मार्च महिन्यातच हा रस्ता दुरूस्तीची मंजुरी मिळाली असल्याचे कळते आहे. मात्र अद्याप पर्यंत रस्त्याचे काम झाले नाही. रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. साईडपट्याही अतिशय खराब झाल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा वाहने नादुरूस्त होतात. या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. देवळा येथे शेतमाल विकण्यासाठी वाहनांची नेहमी ये जा असते. पावसाने तर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब होऊन जणूकाही मृत्युचा सापळा झाला आहे.सध्या पावसाने उघडीप दिली आहे, मात्र तरीही रस्ता खराब असल्याने अनेक लहान-मोठ्या प्रकारचे अपघात होतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने याची दखल घेऊन लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.