रेंजसाठी अंगणवाडी सेविकांना पोर्टेबिलिटीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:07+5:302021-01-08T04:44:07+5:30
गावपातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्वी संपूर्ण गावाच्याच आरोग्याची काळजी वाहावी लागत असे. त्यासाठी अकरा प्रकारचे रजिस्टर अद्ययावत ठेवण्याची ...
गावपातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्वी संपूर्ण गावाच्याच आरोग्याची काळजी वाहावी लागत असे. त्यासाठी अकरा प्रकारचे रजिस्टर अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यात गावातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती, कुटुंबातील सदस्य, घरातील लहान मुले, किशोरवयीन मुले, मुली, गरोदर माता, स्तनदा मातांची माहिती यामध्ये दर दिवशी भरण्याचे अवघड काम केले जात होते. त्यापासून सुटका म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना अॅण्ड्राॅईड मोबाइल दिले. या मोबाइलमध्ये ‘कॉमन अॅप्लिकेशन सिस्टम’ नावाचे अॅप असून, या अॅपमध्ये ऑनलाइन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात प्रारंभी मोबाइलच्या रेंजचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु गावोगावी कंपन्यांनी मोबाइल टॉवर उभारल्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटला असला तरीदेखील येणाऱ्या अडचणी पाहता, मोबाइलची पोर्टेबिलिटी करून त्यांनी त्यावर उतारा शोधला आहे.
--------
खंडित वीज पुरवठ्याचा त्रास
मोबाइलवरच अंगणवाडी सेविकांचे ऑनलाइन काम केले जात असले तरी, बऱ्याच वेळा गावातील खंडित वीज पुरवठ्याचा त्रास त्यांना सोसावा लागतो. वीज पुरवठा नसल्यास मोबाइल टॉवर बंद पडतो, तसेच मोबाइल चार्जिंग करणेही अवघड होऊन बसते.
-------
कामकाजात सुसूत्रता
एकात्मिक बाल विकास विभागाने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे कामकाजात गतिमानता तसेच सुसूत्रता व अचूकता आली आहे. थेट राज्यापर्यंत गावाची माहिती पोहोचू लागली आहे.
-दीपक चाटे, महिला बाल कल्याण अधिकारी
-------------------------------
अकरा प्रकारची कामे करावी लागतात
* गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवणे
* गावातील शून्य ते दोन व दोन ते सहा वयोगटातील बालकांची नोंदणी करणे, या बालकांचे दरमहा वजन घेणे, कुपोषित मध्यम, तीव्र गटात त्यांचे वर्गीकरण करणे.
* गावातील गरोदर महिलांची माहिती संकलित करून त्यांना तिसऱ्या महिन्यांपासूनच देखरेखीखाली ठेवणे, स्तनदा महिलांना पोषण आहार देणे.
* कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविणे, त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे.
* पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, लाभार्थी निश्चित करणे व आहार वाटपावर नियंत्रण ठेवणे.