पुस्तकात आत्मविश्वास देण्याचे सामर्थ :किशोर कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:21 AM2019-12-23T01:21:55+5:302019-12-23T01:22:28+5:30
पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.
नाशिक : पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्र माच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित ‘वाचनाने घडवू जीवन’ या कार्यक्र मात मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. यावेळी कदम यांनी माझ्यातील अभिनेता आणि कवी पुस्तकांच्या मैत्रीमुळे कसा विकसित झाला त्याचे अनुभव सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जीवन जगण्याची कला वाचनासह विचारातूनच सुरू होत असल्याचे नमूद केले. आपल्या देशासाठी काही भव्यदिव्य करण्याचे ध्येय घेऊन उत्तुंग शिखराकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मिळतील तेवढी पुस्तके वाचणे आणि सभोवतालच्या माणसांचे अंतरंग समजून घेणे यातूनच खरे विश्व उलगडते, असे सांगितले. त्यांच्याशी सचिन उषा विलास जोशी यांनी संवाद साधला. पाहुण्यांचे स्वागत विनायक रानडे आणि विश्वास ठाकूर यांनी केले.
कवी प्रकाश होळकर यांनी प्रास्ताविक, तर वास्तुविशारद संजय पाटील यांनी आभार मानले. त्याशिवाय बाल साहित्य संमेलनदेखील रंगले.
उच्च साहित्यमूल्याला वास्तवाचे भान
कुसुमाग्रज हे साहित्यातले दैवत होते. त्यांच्या लेखनातून समृद्ध झाले आणि जीवनाला ऊर्जा मिळाली. कुसुमाग्रजांचे साहित्य हे उच्च साहित्यमूल्य असलेले आणि वास्तवाचे भान असलेले होते, प्रतिपादन अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी केले. ‘समग्र कुसुमाग्रज’ या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात वेलणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात कवी आणि लेखक प्रवीण दवणे आणि विसुभाऊ बापट उपस्थित होते. त्यांच्याशी सदानंद जोशी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रवीण दवणे यांनी तात्यासाहेबांच्या सशक्त लेखणीतून मानवी जगण्याचे आणि व्यवहाराचे दर्शन घडल्याचे सांगितले, तर विसुभाऊ बापट यांनी कुसुमाग्रज हे साहित्यातील अमृत वृक्ष होते, असे सांगितले. यावेळी अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील मस्तानीचा प्रवेश सादर केला. याप्रसंगी नीलिमा पवार, दीपक करंजीकर, एन. सी. देशपांडे, विवेक गरुड, दत्तात्रय कोठावदे आदी उपस्थित होते.