त्र्यंबकेश्वर/येवला : येवला शहरात होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सायंकाळी घरासमोर व चौकाचौकात होळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्याचबरोबर समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करण्यात आली. येथील डी.जे. रोड भागात महत्त्वाची समजल्या जाणा-या होळी सौ. व अविनाश कुक्कर व मधली गल्ली परिसरात श्री. व सौ. मंगेश माळोकार, श्री.व सौ. जितेंद्र भागवत व श्री. व सौ.हर्शल बोरसे यांच्या हस्ते पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली.
होळी सणापासून विविध सणांना प्रारंभ होतो. होळीनंतर धुळवड, रंगपंचमी, गुढीपाडवा असे सण साजरे करण्यात येतात. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर तीन-चार दिवसांपासून नानाविध आकाराच्या टिमक्यांचा खणखणाटाचा निनाद घुमू लागला होता. रविवारी सायंकाळी महिला व युवतींनी होळी पेटविण्याच्या ठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. घरासमोर व चौकाचौकात रात्री उशिरापर्यंत होळ्या पेटविण्यात येत होत्या. महिला व युवतींनी होळीला नैवेद्य दाखवून पोळ्या होळीला अर्पण केल्या. मधली गल्ली परिसरातील सह्याद्री ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात होळी पेटवली व परिसरातील केरकचरा एकत्र करून त्याची होळी केली. होळीच्या मध्यभागीएरंडाच्या झाडाच्या फांद्या लावण्यात आल्या होत्या. फुगेसह सजावट करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर येथे पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला.