नाशिक : गरीब व गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानांतर्गत राज्यातील नाशिकसह सहा जिल्ह्यांत येत्या १ ते २७ मे दरम्यान पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांवर पुढील उपचार शासकीय योजनेतून मोफत करण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. या अभियानांतर्गत नाशिक, अकोला, बीड, चंद्रपूर, पालघर व सांगली या सहा जिल्ह्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. या संदर्भात महाजन यांनी संबंधित जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणीमुळे रुग्णांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या उपलब्ध योजनांमार्फत त्या रुग्णांना योग्य ते पुढील उपचार, शस्त्रक्रिया संंबंधित जिल्ह्णाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग आदी वीस विषयांतील आजारासंदर्भात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी राज्यस्तरावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री अध्यक्ष आहेत तर जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात आमदार, खासदार लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात दि. १ मे रोजी जिल्ह्णाच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अभियानात संबंधित जिल्ह्णातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्णाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाशिकसह सहा जिल्ह्यांत आरोग्यपूर्व तपासणी
By admin | Published: April 21, 2017 1:08 AM