सटाणा : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अलियाबाद परिसराला बुधवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गारांसह वादळी पावसाने झोडपले. तब्बल पाऊन तास झालेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.तीन दिवसांपूर्वी अंतापूर परिसरात तब्बल पंधरा मिनिटे गारांचा पाऊस झाला .या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांदा भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.बुधवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अलियाबाद, जाड, गोळवाड, बाभुळणे, हरणबारी, अजंदे, खराड, मुल्हेर आदी परिसरात सुरवातीला जोरदार वादळ सुरु झाले. त्यानंतर तब्बल पाऊण तास गारांच्या पावसाने झोडपले. या गारपीटमुळे शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांदा, टोमॅटो, मिरची, वालपापडी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.पाऊण तास कोसळलेल्या या गारांच्या पावसामुळे सर्वत्र गारांचा खच पडलेला दिसत होता. सध्या बाजारपेठ नियमति सुरु नाहीत व बाजारभाव पण कमी आहे यामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचा कांदा शेतातच पडून आहे.यातच पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्गाचे धाबे दणाणले आहे. दरम्यान अंतापूर, ताहाराबाद, मांगीतुंगी, ताहाराबाद, दसवेल, सोमपूर, करंजाड आदी भागातही तुरळक पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.------------------------------------कांदा झाकतांना धावाधावपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गटातील , अस्वलीपाडा , अहिवंतवाडी, चामदरी, पवारणीचा पाडा कोल्हेर, पिंपरी अंचला, चौसाळे, पांडाणे, माळे दुमाला, अंबानेर, पुणेगाव, सारसाळे ,परिसरात दुपारी चार वाजच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा, गहू , बाजरी व द्राक्षांचे बारीक नविन फुटव्याला गाराचा मार लागला. भाजीपाल्यासह विविध पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.माल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची बरीच धावाधाव झाली . पांडाणे, पुणेगाव, अंबानेर, चौसाळे , व पिंगळवाडी परिसरात पावसासोबत गारा पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे. सकाळपासुनच आकाशात ढग गोळा झाल्यामुळे शेतकरी धास्तावला होता, परंतू आज चार वाजता जोरदार वादळ व पाऊस आल्याने काढून ठेवलेला कांदा झाकतांना एकच धावाधाव झाली होती.---------------------अभोणासह परिसरात जोरदार पाऊसअभोणा : शहरासह पश्चिम आदिवासी पटयात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सध्या परिसरात काही ठिकाणी कांदा काढण्याचे काम सुरु आहे, तर काही ठिकाणी कांदा काढून उघडयावर ठेवण्यात आला आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली. उघड्यावरील कांदा तसेच गुरांचा चारा भिजून नुकसान झाले आहे. दुपारी तीन वाजता सुरु झालेला पाऊस साडेचार वाजेपर्यंत सुरूच होता.------------------दिंडोरीत वादळी वाºयासह पाऊस : कोरोनाचे संकट असतानाच बुधवारी तालुक्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावत कांदा पिकाचे नुकसान केले आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही वृत्त आहे. तालुक्यातील वणी, वनारे,पांडणे,लखमापूर आदी सह विविध गावांमध्ये विजेचा कडकडाट वादळी वाºयासह बेमोसमी पाऊस झाला काही भागात छोट्या प्रमाणात गाराही झाल्या. सद्या कांदा काढणीचे कामे सुरू असून या बेमोसमी पावसाने कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची धावपळ झाली. काही ठिकाणी कांदा भिजत नुकसान झाले.