नाशिक : कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली असून, विविध स्तरांवर यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. दि. ३ जानेवारी २०१७ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणूक होणार असून, येत्या ९ किंवा १० जानेवारीपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी, महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने टपालाने पाठविण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसह अन्य साहित्याची छपाई करण्यासाठी निविदा मागविल्या असून, निवडणूक कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही नियोजन केले जात आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून ३ जानेवारी २०१७ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी प्रामुख्याने दि. ५ जानेवारी २०१७ रोजी भारत निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या मतदार यादीचे विभाजन करण्याबाबत नियोजन करणे, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करणे, मतदान केंद्रांची तपासणी, संनियंत्रण समिती नेमणे, आचारसंहिता पथकाची निर्मिती करणे, साहित्य छपाई व मागणी, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती अभियान राबविणे, संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र, शपथपत्रे घेणे, स्वतंत्र निरीक्षक नेमणे याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. आयोगाच्या या बैठकीमुळे महापालिकेच्या निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. (प्रतिनिधी)
मनपा निवडणुकीची तयारी सुरू
By admin | Published: December 31, 2016 12:26 AM