खासगी शाळांकडून नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:11+5:302021-06-04T04:12:11+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मागील पूर्ण शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, तर माध्यमिक शाळाही अवघ्या एक ...
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मागील पूर्ण शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, तर माध्यमिक शाळाही अवघ्या एक ते दीड महिन्यांसाठी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी शैक्षणिक वर्ष व प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार याविषयी पालकांच्या मनात शाशंकता निर्माण झाली आहे; मात्र काही खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली असून शहरातील निर्बंध शिथिल होताच शाळा व्यवस्थापनांकडून नवीन शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपु्स्तकांचे वितरणही सुरू केले आहे.
कोरोना संकटामुळे मागील संपूर्ण वर्षभरात प्राथमिक व पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात ऑनलाईन माध्यमातूनच करावी लागली होती. हीच परिस्थिती यावर्षीही कायम आहे. अद्याप कोरोना आजारावर औषध उपलब्ध झालेले नाही. त्याचप्रमाणे १८ वर्षांखालील बालकांचे लसीकरणही झालेले नाही. त्यामुळे या गटातील बालकांना कोरोनाचा तिसऱ्या लाटेत अधिक धोका संभविण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळांनी यावर्षीही ऑनलाईन शिक्षणावरच भर देत नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आवश्यक ती पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत.
कोट-
मागील वर्षाप्रमाणेच यार्षीही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यावर्षीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ऑनलाईन शिक्षणावरच भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. आवश्यक असलेली पाठ्यपुस्तकेही पालकांना उपलब्ध करून देत आहोत. शाळा बंद असली तरी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे, या भूमिकेतूनच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणार आहोत.
- रजिता संपथ, मुख्याध्यापक, भविष्य किड्स, इंदिरानगर.
इन्फो-
नवीन प्रवेश मिळविण्याची कसरत
कोरोना संकटामुळे प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शाळा व्यवस्थापनांसमोरील चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे काही शाळांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर नवीन प्रवेश मिळविण्याची जबाबदारी सोपविली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे इच्छुक पालकांकडून ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती व शाळेविषयीच्या अपेक्षांविषयी माहिती मागविली जात आहे.