मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती : संत निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 02:13 PM2020-06-18T14:13:14+5:302020-06-18T14:13:57+5:30
टाळकरी यांनी परस्परांमध्ये अंतर राखत गोसावी महाराजांना साथ केली. यावेळी बहुतांश वारकरी, टाळकरींनी तोंडावर उपरणे व मास्कदेखील बांधल्याचे दिसून आले.
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदीरात त्यांचा ७२४वा संजीवन समाधी सोहळा अवघ्या तीस ते चाळीस भक्तांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.१८) पार पडला. यावेळी देवस्थानचे पारंपरिक पुजक गोसावी बंधू सर्व विश्वस्त मंडळ व मानकरी यांच्यासह मोजकेच वारकरी भाविक सोहळ्याला उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची संजीवन समाधी मंदीर आहे. दरवर्षी संजीवन समाधी सोहळा मोठ्या थाटात व भक्तीभावात साजरा केला जातो. यावेळी वारकरी भाविकांची मांदियाळी बघावयास मिळते. विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिराच्या परिसरात असते; मात्र कोरोना आजाराचे यंदा आलेल्या संकटामुळे हा सोहळादेखील जास्त गर्दी न करता आटोपता घ्यावा लागला. त्र्यंबकेश्वर येथील इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. संजीवन समाधी सोहळा या कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच थांबविण्याची वेळ ओढावल्याचे देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले. दरम्यान, मंदिरात मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत किर्तन सोहळा देवस्थानचे विश्वस्त पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी संपन्न केला. यावेळी त्यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी टाळकरी यांनी परस्परांमध्ये अंतर राखत गोसावी महाराजांना साथ केली. यावेळी बहुतांश वारकरी, टाळकरींनी तोंडावर उपरणे व मास्कदेखील बांधल्याचे दिसून आले. सुदैवाने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नाही; मात्र कोरोनाला निमंत्रण मिळू नये, यासाठी त्र्यंबकनगरी अधिकाधिक सतर्क राहून खबरदारी घेताना दिसत आहे.