लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आमच्या बँकेतच खाते का उघडता, असा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विचारला जातो, तर नानेगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना लागणा-या अर्जासाठी चक्क सत्तर रुपये आकारण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत तक्रार करून काहीच कारवाई होत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी देवळाली कॅम्पमध्ये एक वयोवृद्ध आजी बचत खाते उघडण्यासाठी आल्या असता तेथील महिला कर्मचा-याने आजीलाच उलट प्रश्न करत आमच्या बँकेतच खाते कशाला उघडता, असा प्रश्न खडसावत बँकेतून आजीला निघून जाण्यास सांगितले. यावेळी उपस्थित एका लष्करी जवानाने त्या महिला कर्मचा-याला ग्राहकांनी खाते उघडले नाही, तर कर्मचाऱ्यांना कामच राहणार नाही अशी जाणीव करून दिली. त्यावर कागदपत्रे अपूर्ण असल्याची सारवासारव त्या महिला कर्मचा-याने केली.नानेगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकेत लष्करी जवान आपल्या पत्नीसह बचत खाते उघडण्यास गेला असता संयुक्त खात्यासाठी आवश्यक असलेला अर्ज बाजूला मिळतो, असे सांगितले व जवानाकडून अर्जाची किंमत म्हणून सत्तर रुपयाची मागणी केली. सदर जवानाने याबाबत अर्ज बँकेत का मिळत नाही अशी विचारणा केली तर तेथेही आमच्या बँकेत का येतात? अशी विचारणा केली गेली. त्यावेळी जवानाने सदर बँक घराजवळ असल्याने आलो, तुम्ही शाखा बंद करा म्हणजे आम्ही बँकेत येणार नाही, असे उत्तर दिले. सदर जवानाने बँकेतून घरी गेल्यानंतर नानेगाव बँकेच्या शाखेत अर्जाकरिता सत्तर रुपये का लागतात याची तक्रार बँकेच्या टोल फ्री नंबरवर केली. या तक्रारीनंतर दुसºया दिवशी त्याच शाखेतून जवानाशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी बँकेत येण्याची सूचना करण्यात आली. मात्र जवान न गेल्याने त्याने तक्रार मागे घेण्यासाठी बँकेतून थेट त्या गावातील ‘बाहुबली’ नेत्यास साकडे घालण्यात आले. रात्री ८ वाजता जवान बँकेत गेला असता, ‘तुमच्यामुळे आम्हाला बँक सुरू ठेवावी लागली, तुम्ही तक्रार केलीच कशाला’ अशा शब्दात कर्मचा-यांनी जवानाला सुनावले. राष्टÑीयीकृत बॅँकांच्या या मुजोरीचा सर्वसामान्य खातेदाराला त्रास सहन करावा लागत असून, एकीकडे बॅँकांचा खातेदार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र ग्राहक नको अशी भूमिका घेतली जात आहे.